पिंपरी चिंचवड शहर परिसरातून चार दुचाकी, एक रिक्षा चोरीला
![Four two-wheelers and a rickshaw were stolen from Pimpri Chinchwad city area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/bike-thief-1.jpg)
पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, निगडी आणि वाकड परिसरातून तीन दुचाकी वाहने तर निगडी मधून एक रिक्षा चोरीला गेली आहे. तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 30) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धनश्री विठ्ठल सुतार उर्फ धनश्री आकाश जाधव (वय 25, रा. गवळीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी आळंदी रोड भोसरी येथील मयुरी मंगल कार्यालयासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
हनुमान रूपनारायण गुप्ता (वय 61, रा. गंगानगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुप्ता यांनी त्यांची 12 हजार रुपये किमतीची दुचाकी 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 30 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आला.
उत्तरेश्वर दत्तु वाघमारे (वय 44, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वाघमारे यांनी प्रेमानंद भगवान सकट यांची रिक्षा शिफ्टने चालवण्यासाठी घेतली आहे. 28 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास फिर्यादी यांनी रिक्षा बौद्धनगर, ओटास्कीम, निगडी येथे पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची 70 हजार रुपये किमतीची रिक्षा चोरून नेली. हा प्रकार 29 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.
अंगद गणपतराव जाधव (वय 34, रा. रामनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 26 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
दिलीप भिवा ढोंबरे (वय 32, रा. सुदवडी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी सात वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घरासमोर घडला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.