‘लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करा, १ कोटी मिळवा’; कोणी केली घोषणा?
![Encounter Lawrence Bishnoi, Get 1 Crore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Lawrence-Bishnoi-1-780x470.jpg)
Lawrence Bishnoi | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यानंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी लॉरेन्स बिश्नोईकडून देण्यात आली आहे. मात्र, याच लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना १ कोटी ११ लाख ११ हजार १११ रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. क्षत्रिय सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून ही घोषणा केली आहे.
राज शेखावत म्हणाले, की लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर कोणत्याही पोलिसाने केल्यास त्याला बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. तसेच केंद्र आणि गुजरात सरकारने बिश्नोईला सुरक्षा पुरविल्याबद्दल करणी सेनेने टीका केली आहे. लॉरेन्स बिश्नोई अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी सध्या गुजरातच्या साबरमती कारागृहात आहे. एप्रिमल महिन्यात सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणातही त्याचे नाव घेण्यात आले होते. मात्र तेव्हा मुंबई पोलिसांना त्याची कोठडी मिळाली नव्हती.
हेही वाचा – महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? रमेश चेन्निथला म्हणाले..
https://x.com/RRKarniSena/status/
राज शेखावत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बिश्नोईच्या डोक्यावर बक्षीस जाहीर करण्याचे कारण सांगितले. सुखदेव सिंह गोगामेडी यांचा खून केल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधात करणी सेनेचा राग आहे. करणी सेनेचे प्रमुख असलेल्या सुखदेव सिंह गोगामेडी यांची ५ डिसेंबर २०२३ रोजी जयपूर येथे हत्या करण्यात आली होती. हत्येच्या काही तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.