विज कनेक्शन कापल्यामुळे भररस्त्यात महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण
घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत
![Electricity, connections, cuts, on the road, MSEDCL, seniors, technicians, beatings,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/mahavitaran-2-1-780x470.jpg)
उल्हासनगर : थकबाकीमूळे वीज कनेक्शन कापल्याच्या रागात थकबाकीदाराच्या मुलाने भररस्त्यात महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील वसिटा कॉलनी येथे उदय रहेजा हे राहतात. त्यांच्याकडे विजेची 18 हजार रुपये थकबाकी होती. तसेच त्यांचे चेक ही बाऊन्स झाले होते.
त्यामुळे दुपारच्या सुमारास महावितरणचे कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यासाठी रहेजा यांच्या घरी गेले होते. वरीष्ठ तंत्रज्ञ इलमुद्दिन शेख आणि सहकारी यांनी वीज कनेक्शन कापून निघत असताना मागून उदय रहेजा यांचा मुलगा रोशन आला. आणि त्याने इलमुद्दिन शेख याना भररस्त्यात मारहाण केली.
या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याकडे धाव घेतल्यावर आणि इलमुद्दिन शेख यांनी तक्रार दिल्यावर पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी रोशन रहेजा याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.