निवडणूक आयोगाचा लवकरच निर्णय ः ठाकरे गटाला मिळणार ‘मशाल’, शिंदे गटाला मिळणार ‘गदा’?
![Election Commission decision soon: Thackeray group will get 'Mashal', Shinde group will get 'Gada'?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-10-at-5.17.56-PM.jpeg)
नवी दिल्ली । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे. यात ठाकरे गटाकडून तीन नव्या चिन्हांचा आणि नावांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही आपली तीन चिन्हं आणि तीन नावं सादर केली आहेत. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे त्रिशूळ, उगवता सूर्य, गदा अशी तीन चिन्हं तर, पक्षाच्या नावाचे ३ पर्याय म्हणून बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची अशी नावं पाठवली आहे.
मात्र शिंदे गटाने सादर केलेल्या चिन्हांमधील त्रिशूळ आणि उगवता सूर्य हे चिन्ह ठाकरे गटानेही सादर केल्याने आता यावरून नवा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून ही दोन्ही समान चिन्हं बाद करण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला ‘मशाल’, तर शिंदे गटाला ‘गदा’ हे चिन्ह दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ठाकरे गटाने काल शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावं निवडणूक आयोगाकडे सादर केली. महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाने पाठवलेल्या नावांमध्ये देखील बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख आहे. यावरूनही नवा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही चिन्हांवर दावा केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे एकाच वेळी जर या चिन्हांवर दोन्ही गटांनी दावा केल्याने दोन्ही चिन्ह बाद होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.