एकनाथजींचे चौकार..षटकार, शब्दाचा बसला मार, झाले गपगार !

शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात जे चौकार आणि षटकार ठोकले, त्यामुळे त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना अक्षरशः गपगार करून टाकले. त्यांनी आरोपरूपी बाऊन्सर्स टाकले होते खरे, पण चौकार षटकार लगावत एकनाथ शिंदे यांनी त्यांची पिसे काढली.
वार-पलटवार कसले? नुसते वारच !
उद्धव आणि आदित्य यांचे एकनाथ शिंदे यांना उद्देशून जे टोमणे होते, किंवा कॉमेडियन कामरा याने एकनाथ शिंदे यांची उडवलेली खिल्ली होती, त्याला एकनाथ शिंदेंनी जबरदस्त तडाखा दिला असून पत्रकार त्याला वार-पलटवार म्हणत असले, तरी ते शिंदेंकडून एकतर्फी वारच होते !
मशाल-खुशाल, डांबर-सांबार !
एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आपला नवीन चेहरा दाखवला. आपल्याला शिंदेंचा शांत स्वभाव आठवतो, पण आक्रमक एकनाथ शिंदे पाहायला मिळाले. ठाकरे घराण्याच्या कोणत्याही टीकेला आपण घाबरत नाही, असे दाखवून देण्यासाठी ते अक्षरशः तुटून पडले. एकनाथ शिंदे यांनी शब्दांमधली लय म्हणजे रिदम साधला आणि शब्दांची उधळण केली. त्यामुळे ऐकणारे सुद्धा सुखावले ! उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलताना त्यांनी टोमणा लगावला, की कार्यकत्यांनी पेटवा मशाल, आम्ही झोपतो खुशाल! अशी यांची अवस्था आहे.
हेही वाचा – एआयद्वारे एफआयआर दाखल करणार का? पोलीस आयुक्त म्हणाले, “तोपर्यंत पोलिसांच्या नोकऱ्या…”
डस्टबिन.. मिस्टर बिन..
सध्याच्या ठाकरे परिवाराने कार्यकत्यांना कचरा समजला आहे. त्यामुळेच त्यांना आम्ही हाय व्होल्टेज शॉक दिला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांना कचरा समजून हे ‘डस्टबिन’ ची जागा दाखवतात, पण, हे स्वतः मिस्टर बिन आहेत, हे विसरून कसे चालेल ? शिंदे यांच्या या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
आरशात वारसा शोधता का?
मुंबईच्या रस्त्यांवर हे नेहमी प्रश्न विचारतात, पण एवढी वर्षे डांबराचं सांबर कोणी खाल्ले, हे स्पष्ट करावे, असेही शिंदे म्हणाले. फक्त आरशात बघून आणि सांगून वारसा सांगता येत नाही, असे म्हणत शिंदेंनी ठाकरे पिता-पुत्रांना टोले लगावले. शिंदेंची चौफेर टोलेबाजी सुरू असताना आणि षटकारांची बरसात होत असताना उबाठा गट हतबल होऊन बसल्याचे चित्र दिसले!
पोपटाचा जीव पिंजऱ्यात..
सध्या काँक्रीटचे रस्ते करणे सुरु आहे. त्यामुळे लोकांना थोडा त्रास होतोय, परंतु, त्यानंतर पुढील २५ वर्ष मुंबईत खड्डे दिसणार नाहीत. डांबरात हात काळे करण्याची संधी आता तुम्हाला मिळणार नाही. पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो, यांचा जीव मुंबईतील रस्ते आहेत. मागच्या अनेक वर्षात ‘डांबराचे सांबर कुणी खाल्ले’ हे आता समोर यायला हवं, असा शिंदेंचा सूर होता.
आदित्य यांच्यावर शाब्दिक भडीमार
काही मिस्टर बिन यांनी डस्टबिनचा उल्लेख केला. सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्यामुळे तुमचा ‘डस्टबिन’ व्हायची वेळ आली आहे. आम्हाला कचरा समजलात, त्यामुळे याच कचऱ्याने तुम्हाला हायव्होल्टेज शॉक दिला, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.
‘रिझन देणाऱ्यांचा सिझन’ संपला..
एका मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांचा अंतिम आठवडा ‘प्रस्ताव उथळ’ होता. अनेक विषय पुन्हा पुन्हा आलेले आहेत. ‘महायुती’ ची दुसरी इनिंग सुरु झाली आहे. ‘नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन’ देणारे आमचे सरकार आहे. ‘रिझन’ देणाऱ्यांचा ‘सिझन’ जनतेने संपवून टाकला आहे. पाच वर्षांची टेस्ट मॅच आमची सुरु झाली आहे. पण काम ‘टी-20’ सारखे असणार आहे.
आरशात पाहून वारसा नको..
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगजेबासारखे वाटले, त्यांना सांगायला हवे, की सगळीच वेळ सारखी नसते. मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना आता शहाणपण आले असेल, गद्दार, गद्दार म्हणून टीका करत बसलात. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही, हे लक्षात ठेवा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला लगावला.
तेव्हा कुठे होते संविधान ?
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, खोट्या केसेस उभ्या करून आमदार प्रसाद लाड आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न करताना कुठे होते संविधान ? नारायण राणे यांना अटक करताना संविधान आठवले नाही ? राणा दाम्पत्याला त्रास देताना संविधान आठवले नाही ? सचिन वाझे काय लादेन आहे का, असं म्हणताना संविधान आठवले नाही? कंगणा राणावत यांच्या घरावर बुलडोझर चालवताना संविधान आठवले नाही ? कार्यकत्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल अशी यांची अवस्था आहे. या शिल्लक सेनेने आपलीच काळजी करावी, असा टोमणा शिंदे यांनी मारून बरेच काही सूचित केले आहे.
एकनाथ शिंदे नक्कीच रमले..
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री पद मिळाले म्हणून काहीसे नाराज असणारे एकनाथ शिंदे आता या सरकारमध्ये नक्कीच रमले आहेत. उबाठा गटावर खरपूस टीका करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असावी आणि ती ते चोखपणे पार पडत असावेत, हे नक्की !