कोरोना प्रतिबंधासाठी डीएनएवर आधारित लस आली, झायकॉव्ह डी लसीचे तीन डोस ठरणार प्रभावी
![DNA-based vaccine for corona prevention, three doses of Zykov D vaccine will be effective](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/zycov-d.png)
नवी दिल्ली -डीएनएवर आधारित असलेली झायडस कॅडिला या अहमदाबादच्या कंपनीने झायकॉव्ह डी नावाची लस विकसित केली आहे.या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याकरिता या आठवड्यात कंपनीकडून केंद्र सरकारकडे अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. या लशीला परवानगी मिळाली, तर ती डीएनएवर आधारित असलेली जगातली पहिलीच लस ठरेल.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरता ही लस जनुकीय घटकांचा वापर करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. प्लाझ्मिड डीएनए साधारणतः बॅक्टेरियाच्या पेशीमध्ये आढळतो. त्याचं स्वतंत्रपणे पुनरुत्पादन होऊ शकतं. मानवी शरीरात गेल्यानंतर प्लाझ्मिड डीएनए व्हायरल प्रोटीनमध्ये रूपांतरित होतं. त्यामुळे विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती शरीरात तयार होते. विषाणूची वाढ यामुळे रोखली जाते. या लशीचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन झालं, तर या लशीत अवघ्या काही आठवड्यांत त्यानुसार बदल करणं शक्य आहे.
भारतात सध्या उपलब्ध असलेल्या लसीचे दोन डोस घ्यावे लागत आहेत. मात्र, या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. कॅडिला कंपनीच्या या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात घेतलेल्या चाचण्यांमध्ये असं आढळलं, की तीन डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती दीर्घ काळपर्यंत टिकून राहते. या लसीच्या दोन डोसच्या प्रभावबद्दलच्या चाचण्याही सुरू आहेत. प्रत्येक डोसमध्ये 28 दिवसांचं म्हणजेच चार आठवड्यांचं अंतर असेल.
जेट इंजेक्टरद्वारे दिली जाणार
झायकॉव्ह डी ही लस आणखी एका बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही लस घेताना संबंधित व्यक्तीला कमीत कमी वेदना होण्याच्या दृष्टीने ही लस सुईद्वारे नाही, तर जेट इंजेक्टरद्वारे (Jet Injector) दिली जाणार आहे. यात लस उच्च दाबाखाली व्यक्तीच्या त्वचेत दिली जाते. 1960मध्ये विकसित झालेल्या जेट इंजेक्टरच्या वापराला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2013मध्ये परवानगी दिली. 2014पासून अमेरिकेत याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला असून, युरोप, आफ्रिका आणि आशियातल्या काही देशांमध्येही त्याचा काही प्रमाणात वापर होतो.
रिपोर्टनुसार झायकॉव्ह डी या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीचा डेटा जवळपास तयार झाला असून, कंपनीने सरकारला याची कल्पना दिली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात भारतीय औषध नियामक प्राधिकरणाकडे (DGCI) मंजुरीसाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. जूनच्या अखेरीपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कंपनीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
या लशीच्या चाचण्या प्रौढांवर, 12 ते 18 वयोगटातल्या व्यक्तींवर, तसंच गंभीर विकार असलेल्या व्यक्तींवर घेतल्या जात आहेत. 12 ते 18 वयोगटातल्या मुलांवर लसीचे साइड इफेक्ट्स दिसले नाहीत, असं कंपनीचं म्हणणं आहे. त्यामुळे लसीला परवानगी मिळाली, तर ती 18 वर्षांखालच्या व्यक्तींसाठी देशातली पहिली लस ठरेल. 5-12 या वयोगटातल्या मुलांवरही या लशीच्या चाचण्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
झायडस कॅडिला कंपनी एका वर्षात 24 कोटी डोसची म्हणजेच एका महिन्यात दोन कोटी डोसची निर्मिती करू शकते. मंजुरीनंतर पहिल्या महिन्यात एक कोटी डोसेसची निर्मिती केली जाणार असून, नंतर उत्पादन दुप्पट केलं जाणार आहे. त्याहून अधिक उत्पादन करण्यासाठी दुसऱ्या कंपन्यांसोबतही बोलणी सुरू आहेत. ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानालाही साठवता येते. त्यामुळे लशीची साठवण आणि वाहतूक सोपी आहे.