हुकूमशहा किम जोंग उन यांचा उत्तराधिकारी ठरला; मुलगी किम जू-ए चर्चेत

Kim Jong Un | उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांचा उत्तराधिकारी ठरल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था ‘नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस’ (NIS) यांनी संसद सदस्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग-उन आपल्या मुली किम जू-ए हिला पुढील नेतृत्वासाठी तयार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या संदर्भात उत्तर कोरियाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही माहिती अद्याप अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नाही.
सार्वजनिक कार्यक्रमांमधील वाढती उपस्थिती
वृत्तानुसार, किम जोंग-उन यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या मुलीला अनेक महत्त्वाच्या लष्करी आणि औपचारिक कार्यक्रमांमध्ये सोबत घेतले आहे. विशेषतः क्षेपणास्त्र चाचण्या, लष्करी संचलने आणि महत्त्वाच्या राज्य कार्यक्रमांमध्ये किम जू-ए यांची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने उत्तराधिकाराबाबतचे मूल्यांकन करताना तिच्या वाढत्या सार्वजनिक भूमिकेचा विचार केला असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : बंगळुरू मध्ये भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
किम जू-ए कोण आहे?
किम जू-ए हिच्या अचूक वयाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेनुसार ती सुमारे १३ वर्षांची असल्याचे मानले जाते. नोव्हेंबर २०२२ मध्ये किम जोंग-उन यांनी पहिल्यांदा आपल्या मुलीची जगासमोर ओळख करून दिली. त्यानंतर ती अनेक सरकारी कार्यक्रमांमध्ये दिसू लागली.
उत्तर कोरियातील माध्यमांवर कडक निर्बंध असल्याने तिचे नाव अधिकृतरीत्या क्वचितच घेतले जाते. तिला प्रामुख्याने “नेत्याची लाडकी कन्या” किंवा “आदरणीय कन्या” अशा विशेषणांनी संबोधले जाते. दरम्यान, उत्तर कोरियाच्या पुढील नेतृत्वाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली असून, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.




