बंगळुरू मध्ये भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

Bengaluru Road Accident | बंगळुरु येथे दोन कार, दुचाकी आणि आयशरच्या झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. होस्कोट तालुक्यातील सत्यवारा गावाजवळ आज (१३ फेब्रुवारी) पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. दोन कार, एक दुचाकी आणि आयशर ट्रक यांचा यात समावेश असून अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि आयशर ट्रक पलटी झाला.
हा अपघात दोब्बासपेट–होस्कोट सॅटेलाइट टाउन रिंग रोड (STRR) वर घडला. प्राथमिक माहितीनुसार, होस्कोट येथून देवणाहळीकडे जाणाऱ्या भरधाव कारने प्रथम दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडक दिली. त्यानंतर आणखी एक कारही या साखळी अपघातात सापडली.
हेही वाचा : नागरी आरोग्यसेवेस सर्वोच्च प्राधान्य!
या दुर्घटनेत कारमधील सहा जणांचा आणि दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. काही क्षणांत सलग धडकांमुळे घटनास्थळी भीषण परिस्थिती निर्माण झाली. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तत्काळ बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून मृतदेह होस्कोट येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.




