दिल्लीत यावेळी नक्की ‘कमळ’ च फुलणार !
![Delhi, of course, 'Lotus', will bloom,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/bjp-780x470.jpg)
अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी म्हणजेच ‘आप’ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील रस्सीखेच दिल्लीत अगदी शिगेला पोहोचली आहे. प्रचाराची रणधुमाळी संपली, तोफा थंडावल्या आणि आता मतदानाचा दिवस आला. दोन्ही बाजूंनी तुफान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या असल्या तरी यावेळी सगळीकडे ‘कमळ’ च बाजी मारणार आणि सत्ता भाजपाचीच येणार असे चित्र आहे.
गेल्या वेळी ‘आप’ कडे अमर्याद सत्ता आली होती. 70 पैकी तब्बल 67 निवडून आणून ‘आप’ ने एक उच्चांक गाठला होता. पण, अमर्याद सत्तेचे तोटे काय याचा त्यांनी कधी विचार केला नव्हता..आणि त्यातूनच मग उद्भवली एकापाठोपाठ एक अनेक भ्रष्टाचार आणि घोटाळ्याची प्रकरणे !
भाजपाचे बोट भ्रष्टाचारावर
प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपाच्या आरोपांचा मुद्दा होता तो मध्य घोटाळ्यात केजरीवाल यांच्या टीमने केलेला प्रचंड घोटाळा! त्याचबरोबर त्यांना दुसरा मुद्दा मिळाला तो म्हणजे केजरीवाल्यांनी राहण्यासाठी उभे केलेले शीशमहल.. भाजपाचे सर्व नेते या दोन मुद्द्यांभोवती प्रचार करत असले तरी ते खोडून काढणे मात्र केजरीवाल आणि त्यांच्या टीमला अजिबात जमले नाही आणि प्रचारातच त्यांची पीछेहाट झाली.
दिल्लीचे मतदार आगळे वेगळे
दिल्लीचे मतदार म्हणजे एक आगळावेगळा प्रकार आहे. एखाद्याला उचलून धरायचे ठरवले तर त्याच्या स्पर्धकाला ते भुईसपाट करतात. हाच अनुभव गेल्या वेळी अरविंद केजरीवाल यांना आला. त्यावेळी भाजपाचा सुखडा साफ झाला होता. यावेळी मात्र दिल्लीच्या गल्लीबोळात एक फेरफटका मारला तर सगळीकडे कमळाचीच हवा आहे. केजरीवाल आणि त्यांचा कंपू हळूहळू आपली तुरुंगातील जागा आरक्षित करणार, असे काहीसे चित्र आहे.
हेही वाचा : ‘नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीत ८८ कोटींचा घोटाळा’; अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
भाजपाला दिल्लीचे तख्त हवे आहे
एक गोष्ट नक्की की, केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्लीची सत्ता कायम राखायची आहे, तर केंद्रात सत्तेची हॅटट्रीक संपादन करणाऱ्या भाजपाला दिल्लीचे तख्त खेचून घ्यायचे आहे. दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. यापूर्वी सलग पंधरा वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसला यावर्षी तरी दिल्ली विधानसभेत खाते उघडायला मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.
‘आप’ चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर
गेल्या वर्षभरात केजरीवाल व त्यांचे सरकारमधील सहकारी किती भ्रष्ट आहेत हे भाजपाने दिल्लीकर जनतेपुढे मांडले. केजरीवाल यांच्यासह तिघा मंत्र्यांनाही जेलमध्ये काही दिवस काढावे लागले. त्यामुळे गेली बारा वर्षे केजरीवाल यांची असलेली लोकप्रियता या निवडणुकीत कायम आहे की घसरणीला लागली आहे, याचा कस या निवडणुकीत लागणार आहे. शेकडो कोटींच्या भ्रष्टाचारांच्या गंभीर आरोपांमुळे व मद्य विक्रीच्या धोरणात सरकारचे कोट्यवधी रुपये नुकसान झाल्याचा ठपका ठेवला गेल्याने यावेळी आम आदमी पक्षाला फटका बसणार आहे.
सव्वीस वर्षे भाजपाकडे सत्ता नाही!
भाजपाची १९९३ ते १९९८ या काळात दिल्लीवर सत्ता होती. अगोदर मदनलाल खुराणा, नंतर साहिबसिंग वर्मा आणि शेवटी काही महिने सुषमा स्वराज असे पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री भाजपाने दिल्लीला दिले. नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सर्वच्या सर्व सातही खासदार दिल्लीकरांनी अनेकदा निवडून दिले, पण, गेल्या २६ वर्षांत भाजपाला दिल्ली विधासभेची सत्ता मिळवता आली नाही. यंदाच्या निवडणुकीत दिल्लीत मोदींची जादू चालेल का हाच कळीचा मुद्दा आहे. भाजपा किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे दिल्लीला सर्वमान्य नेता नाही. आम आदमी पक्षाकडे केजरीवाल आणि त्यांची फौज आहे. भाजपाकडे कार्यकर्ते आहेत पण दिल्लीला चेहरा नाही, हे मान्य करावेच लागेल!
आयारामांना भाजपाची उमेदवारी
आप आणि काँग्रेसमधून आलेल्या हायप्रोफाइल नेत्यांनाही या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी दिली आहे. दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंद सिंह लवली, तसेच आपचे माजी मंत्री राजकुमार चौहान, कैलाश गेहलोट, राजकुमार आनंद हे भाजपाच्या तिकिटावर लढत आहेत.दिल्ली विधानसभेची निवडणूक आप व भाजपाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. तसेच तीनही प्रमुख राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रेवड्यांची उधळण केल्याने निवडणूक चुरशीची व रोचक बनली आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री झाल्यावर आरोग्य सेवा, शालेय शिक्षण यावर भर दिला आणि सार्वजनिक बस प्रवासात मोफतची सवलत दिली.
केजरीवालांच्या रेवड्याची टिंगल
सरकारी शाळा खासगी शाळांसारख्या आधुनिक व दर्जेदार बनवल्या. सरकारी इस्पितळात विश्वसनीय सेवा व सुधारणा केल्या. सेवांचा दर्जा व सुधारणा या आधारावरच दिल्लीकर मतदारांनी केजरीवाल यांच्या पक्षाला दोन वेळा प्रचंड बहुमत देऊन विधानसभेत सत्ता दिली. केजरीवाल यांच्या मोफत रेवड्याची टिंगल भाजपाने भरपूर केली.
पण, त्याचे अनुकरण मध्य प्रदेशने केले. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिलांसाठी लाडकी लक्ष्मी योजना सुरू केली. भाजपाला लक्ष्मी योजनेने विधानसभा जिंकून दिलीच शिवाय या राज्यातून भाजपाचे २९ खासदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. नंतर झारखंड, महाराष्ट्रातही महिलांसाठी मोफत योजनांच्या घोषणा झाल्या. ‘लाडकी बहीण’ किंवा ‘लक्ष्मी योजना’ राबवताना उमेदवाराला किंवा राजकीय पक्षांना कोणताच खर्च येत नाही. सरकारी खजिन्यातूनच महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतात. महिलांना पैसे मिळतात आणि त्यांची मते रेवड्या वाटणाऱ्या पक्षाला मिळतात. दिल्लीतील विधानसभा निवडणूकही रेवड्यांच्या घोषणांवरच लढवली जात आहे. २०१५ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे ७० पैकी ६७ जागांवर आमदार निवडून आले. दिल्लीने एकमुखाने केजरीवाल यांना पाठिंबा दिला.
घोडा मैदान जवळ आहे
घोटाळे व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली केजरीवाल यांना जेलमध्ये जावे लागल्याने आतिशी यांच्यावर पक्षाने मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली. आतिशी या भले मुख्यमंत्री असल्या तरी पक्षाचे सर्वेसर्वा सुप्रीम नेते हे केजरीवालच आहेत. आधुनिक सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनिक, महिलांना मोफत बस प्रवास, २०० युनिटपर्यंत वीज मोफत, २० हजार लिटर पाणी मोफत, ज्येष्ठांना मोफत तीर्थयात्रा अशा घोषणा राबवत केजरीवाल यांनी दिल्लीतील सत्ता मिळवली. आता तर लाडकी बहीण योजनेची जादू फिरवली आहे. रेवड्यांच्या शर्यतीत भाजपा व काँग्रेसही सामील झाली आहे, स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात कोणालाच रस नाही, हे दुर्दैवाने नमूद करावे वाटते.
बघू या, घोडा मैदान अगदी जवळ आले आहे. केजरीवाल्यांच्या रेवड्याची यावेळी ताकद दिसत नाही काँग्रेस तर पूर्वीच भुईसपाट झाली असून सध्या व्हेंटिलेटरवर आहे, त्यामुळे, आत्ताची परिस्थिती पाहता आणि नरेंद्रजी मोदी यांची पुन्हा आलेली लाट पाहता दिल्लीमध्ये पुन्हा कमळ फुलणार असे म्हणण्याचे म्हणूनच धाडस करावे वाटते!