ताज्या घडामोडी

एक पडदा चित्रपटगृह: हरवलेला सिनेमा जादूचा काळ

पुणे शहर! या सांस्कृतिक राजधानीच्या हृदयात कधी काळी असंख्य एक पडदा चित्रपटगृहांची ओळख होती. प्रभात, अलंकार, निलायम, अलका, लक्ष्मीनारायण, वसंत, विजय, जय हिंद, राहुल… ही नावे फक्त थिएटरची नव्हती; ती प्रत्येक पुणेकरासाठी आठवणींची बेटं होती. त्या काळात थिएटरमध्ये सिनेमा बघणं म्हणजे एका जत्रेचा अनुभव होता. आज या चित्रपटगृहांची दारं जरी बंद झाली असली, तरी त्या पडद्यावर झळकणाऱ्या आठवणी मात्र आजही जिवंत आहेत.

गुज-गोष्टींच्या पडद्यामागे

डर… शाहरुख खानचा तो सिनेमातला ‘किरण’ म्हणणारा आवाज अजूनही निलायम टॉकीजशी जोडला जातो. त्या थरारक सीनसह पुणेकरांच्या हृदयातही निलायमचं नाव कोरलं गेलं. तसेच, प्रभात टॉकीजच्या गल्ल्यांमध्ये ‘माहेरची साडी’चे हुंदके अजूनही गुंजतायत. अलका कुबलच्या पडद्यावरच्या भूमिका आणि प्रेक्षकांमधील भावनिक सहभाग… हे चित्रपटगृह म्हणजे पुण्याच्या भावविश्वाचा आरसा होता.

तसंच, प्रभातमध्ये सुरू असलेल्या ‘बनवाबनवी’च्या खेळादरम्यान संपूर्ण थिएटर हास्याने दणाणून जायचं. ते थिएटर फक्त चित्रपटासाठी नाही, तर लोकांना जोडणाऱ्या हसऱ्या आठवणींसाठी प्रसिद्ध होतं. या आठवणी फक्त सिनेमांपुरत्या मर्यादित नव्हत्या, तर त्या थिएटरमध्ये अनुभवलेल्या क्षणांशी जोडलेल्या होत्या.

कथा, किस्से, आणि थरार

‘पांडू हवालदार’चा खेळ पाहायला आलेले पद्मश्री अशोक सराफ… खेळ सुरू होईपर्यंत कोणालाही त्यांचं अस्तित्व कळलं नाही. पण जसा सिनेमा संपला, तसं प्रेक्षकांचं प्रेम त्यांच्या भोवती उसळलं. त्यांची बाहेर पडण्याची धडपड आजही पुण्याच्या चित्रपटप्रेमींच्या आठवणीत आहे.

एक काळ होता, जेव्हा थिएटर ही केवळ करमणुकीची जागा नव्हती, तर ती जीवनाचा भाग होती. सिनेमा सुरू व्हायच्या आधी मिळणाऱ्या गरमागरम बटाटेवड्याची चव, इंटरव्हलला मिळणाऱ्या कोल्ड ड्रिंक्सचे गारवे, आणि संपल्यानंतर घरी जाताना सिनेमावर रंगणाऱ्या चर्चा… हे अनुभव आता मल्टिप्लेक्समध्ये नाही मिळणार.

एक पडदा चित्रपटगृहांचा अस्त आणि भविष्याचा विचार

मल्टिप्लेक्सच्या झगमगाटाने या एक पडदा चित्रपटगृहांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं. जागेच्या किमती वाढल्या, तंत्रज्ञान जुनं पडलं, आणि आर्थिक समस्यांमुळे ही चित्रपटगृहं एकामागून एक बंद होत गेली. आता त्या जागा भकास पडल्या आहेत. काहींना न्यायालयीन प्रकरणांनी जखडून ठेवलं आहे, तर काहींवर नव्या इमारतींची सावली येऊन पडली आहे.

पण प्रश्न असा आहे की, ही चित्रपटगृहं पुन्हा का उभारी धरू शकत नाहीत? जर इच्छा असेल, तर यासाठी मार्ग नक्कीच निघू शकतो. जुन्या थिएटरच्या अनुभवाला आधुनिक रंग देऊन, त्यांना नव्या पिढीसाठी सादर करता येईल.

हेही वाचा  :  ‘अजिंक्य डी वाय पाटील’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच केली ग्राम स्वच्छता! 

पुनरुज्जीवनाची संधी

१. जुन्या क्लासिक सिनेमांचे शो: जुन्या चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या दर्दी प्रेक्षकांसाठी खास खेळ आयोजित करता येतील.
२. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: डिजिटल प्रोजेक्शन आणि उत्कृष्ट ध्वनी प्रणालीने ही चित्रपटगृहं अपग्रेड करता येतील.
३. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन: स्थानिक कलाकार, नाटके, आणि सांस्कृतिक महोत्सवांसाठी या थिएटरचा उपयोग होऊ शकतो.
४. स्थानिक रसिकांची मदत: पुण्याच्या रसिकांनी पुढाकार घेऊन या चित्रपटगृहांना सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करावं.

संस्कृतीचा वारसा टिकवणं गरजेचं आहे

चित्रपट फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर ते सामाजिक बंध मजबूत करणारं माध्यम आहे. या एक पडदा चित्रपटगृहांनी केवळ सिनेमेच नाही दाखवले, तर पुण्याच्या संस्कृतीला आकारही दिला. यांना वाचवणं म्हणजे पुण्याच्या इतिहासाला जिवंत ठेवणं.

आजही जुन्या काळाची गोडी जपणाऱ्या पुणेकरांच्या मनात या चित्रपटगृहांची आठवण ताजी आहे. योग्य इच्छाशक्ती, योजनाबद्धता, आणि प्रामाणिक प्रयत्न यांमुळे ती पुन्हा उभारी घेऊ शकतात. कारण एक पडदा चित्रपटगृह हे फक्त भिंतीत बांधलेलं थिएटर नव्हतं; ती एक जादुई दुनिया होती, जी प्रेक्षकांना वास्तवाच्या पलीकडे घेऊन जायची.

निष्कर्ष:

“एक पडदा चित्रपटगृहं ही केवळ भूतकाळाची गोष्ट नाहीत; ती भविष्यासाठीही प्रेरणास्थान आहेत. त्यांचा सांभाळ करणे आपली जबाबदारी आहे.”

लेखक: हर्षल आल्पे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button