#Covid-19: कॅनडा, ब्रिटनमध्ये आली कोरोनाची दुसरी लाट; मुंबईत काय आहे परिस्थिती?
नवी दिल्ली: जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचं संकट पसरलेलं आहे. सुरुवातीला युरोपात आणि अमेरिकेत वेगाने रुग्ण वाढत होते. आता तिथे कोरोनाचा आलेख सपाट झाला म्हणजे बेसुमार वाढ थांबली आहे. मात्र सध्या ब्रिटन आणि कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं म्हटलेलं आहे.
मुंबई आणि दिल्लीतही सुरुवातीला वाढलेली Covid-19 रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आणि पुन्हा वाढू लागल्याने ही दुसरी लाट आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. भारतात आतापर्यंत जवळपास 92 हजारांवर Covid रुग्णांचा मृत्यू झाला असून दररोज हजारो नव्या रुग्णांची भर देखील पडत आहे. Corona रुग्णांच्या एकूण संख्येत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. 58 लाखांवर कोरोनारुग्ण देशात सापडले आहेत.
जगभरात सर्वांत जास्त रुग्ण हे अमेरिकेत सापडलेले असून ती संख्या 71 लाखांच्या वर आहे. जगभर एकूण रुग्णांची संख्या 3 कोटी 4 लाख 7 हजार इतकी झालेली आहे. यामध्ये जवळपास 10 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण अमेरिकेसह युरोपमध्ये रुग्णवाढीचा वेग मंदावल्यामुळे थोडा दिलासा मिळत होता, असं असतानाच पुन्हा रुग्णवाढीची बातमी आलेली आहे.