#CoronaVirus:सांगलीमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन: पालकमंत्री जयंत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/896af1adc5f05e88b241b678dff09543.png)
सांगली: ‘जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेर लॉकडाऊन ठेवण्यात येईल. या काळात उर्वरित ग्रामीण भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळावा. लॉकडाऊन व जनता कर्फ्यू या दोन्हींमध्ये जनतेने संपूर्ण सहकार्य द्यावे,’ असं आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलेलं आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मर्यादीत ठेवण्यात यश आलेले आहे.
प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीचे व त्यास लोकांनी दिलेल्या सहकार्याचे हे यश आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या यापुढेही मर्यादित रहावी यासाठी 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेरपर्यंत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन व उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. जनता कर्फ्यूच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालन करावे. लॉकडाऊन 22 जुलै रात्री 10 नंतर सुरू होणार असल्याने नागरिकांच्या हातात पुरेसा वेळ आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यक गर्दी करू नये. खरेदीसाठी झुंबड उडू नये, नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.