#CoronaVirus: मानवी अधिवासात भटकलेली वाघिण विलगीकरणात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/lion.jpg)
भोपाळ : मानवी अधिवासात फिरण्याची सवय असलेल्या एका वाघिणीस भोपाळमधील वनविहार नॅशनल पार्क येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तिला मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्य़ात पहिल्यांदा पिंजराबंद करण्यात आले होते. अलीकडेच ही वाघीण महाराष्ट्रातील मानवी अधिवासात भरकटल्याचे दिसून आले. या वाघिणीने अमरावती जिल्ह्य़ात ऑक्टोबर २०१८ मध्ये दोन बळी घेतले होते. नंतर ही वाघीण मध्य प्रदेशात काही भागात फिरली.
तिला महाराष्ट्रालगत असलेल्या बेतुल जिल्ह्य़ात ११ डिसेंबर २०१८ रोजी पकडण्यात आले. नंतर या वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात तिचे वास्तव्य होते. पण तरीही मानवी अधिवासात भटकण्याची तिची सवय गेली नाही. १० फेब्रुवारी २०१९ रोजी या वाघिणीस कान्हा व्याघ्र प्रकल्पात ठेवण्यात आले. तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात अपयश आल्याने वनविहार नॅशनल पार्क येथे आणण्यात आले. आता तिला तेथेच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. वनविहार नॅशनल पार्कमध्ये आता १४ वाघ आहेत.