#CoronaVirus: नव्या कोरोना रुग्णामुळे साताऱ्यात खळबळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona7-1.jpg)
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणारा ३५ वर्षीय तरुण करोना बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर या करोनाग्रस्त तरुणाच्या तांबवे (ता. कराड) या गावासह सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेने तांबवेतील ३३ जणांना होम क्वारंटाइन राहण्याची सक्ती केली आहे. दरम्यान, निजामुद्दीन-दिल्ली येथे मरकजला गेलेल्यांची सातारा जिल्ह्यातील संख्या ७ असून, या सातही जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल नकारात्मक आल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. तर सातारा जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या ३ असून, आज रुग्णालयात अनुमानित म्हणून तब्बल ६२ रुग्णांची वाढ होऊन ही संख्या १६६ झाली.
‘करोना’चा संसर्ग रोखण्यात सातारा जिल्ह्यातील जनता एकजुटीने आघाडीवर राहिली. गेल्या आठवडाभरात करोनाग्रस्तांची संख्या दोनवरच स्थिर होती. पण कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या १९ अनुमानित रुग्णांपैकी १८ जणांचे अहवाल नकारात्मक येताना, ३५ वर्षीय अनुमानित तरुण करोना बाधित असल्याचा अहवाल आल्याने करोनाचा विळखा घट्ट होऊ नये म्हणून प्रशासनाबरोबरच वैद्यकीय यंत्रणा, पोलीस व सामाजिक कार्यकर्ते कमालीचे सतर्क झाले आहेत. लोकांमध्येही करोनाचे गांभीर्य असून, सर्वत्र सजगता, सतर्कता अगदी पाळली जात असल्याचे चित्र आहे.
दिवसेंदिवस करोना संशयितांची संख्या वाढत राहिली असली,तरी सरसकट चाचणी अहवाल नकारात्मक येत आहेत. शासकीय माहितीनुसार सातारा जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या ३ असून, आज रुग्णालयात अनुमानित म्हणून तब्बल ६२ रुग्णांची वाढ होऊन ही संख्या १६६ झाली. या १६६ जणांपैकी १०५ जणांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले. तर, ५८ जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयात दाखल १६६ जणांपैकी १०५ जणांना घरी सोडण्यात आले असून, ६१ जण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली दाखल आहेत. त्यात ३ करोना बाधितांचा समावेश आहे. परवा, बुधवारअखेर परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांची नोंदणी संख्या ५५४ होती. ती आज ५७८ झाली असून, त्यातील ४२२ जणांचा होम क्वारंटाइनचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. उर्वरित १५६ जणांचा १४ दिवसांचा होम क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झालेला नाही.