#CoronaVirus: दुःखद! तीन मिनिटात वडिलांचं अंत्यदर्शन घ्या, मुलीला धाय मोकलून रडताना पाहून डॉक्टरही हळहळले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Corona-Manipur.jpg)
करोनामुळे अनेक कुटुंबांवर संकट कोसळलं असून अखेरच्या क्षणी अंत्यदर्शन करण्याची संधीही मिळत नाही आहे. असाच अनुभव मनिपूरमधील २२ वर्षीय तरुणीला आला. करोना संशयित असणाऱ्या तरुणीला इम्फाळ येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. याचवेळी दीर्घ आजाराने तिच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर तिला मनिपूर येथील तिच्या घरी आणण्यात आलं. पण तरुणीला वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी फक्त तीन मिनिटं देण्यात आली होती.
तरुणी आपल्या वडिलांचं अंत्यदर्शन घेत असल्याचा ह्रदयद्रावक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तरुणी वडिलांच्या मृतदेहाजवळ जाऊन त्यांना निरोप देत असताना तिची आई, नातेवाईक किंवा शेजारी कोणालाही तिच्या जवळच जाण्याची परवानगी नव्हती. मुलगी समोर धाय मोकलून रडत असताना तिच्या आईकडे मात्र पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. यावेळी डॉक्टरांचं सर्व लक्ष मात्र घड्याळाकडे होतं. तीन मिनिटं पूर्ण होताच डॉक्टरांनी तरुणीला तेथून हलवलं.
२५ मे रोजी तरुणी चेन्नई येथून श्रमिक ट्रेनने आपल्या घरी परतली होती. ट्रेनमधील एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने तरुणाला संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलं होतं. प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतल्यानंतर आणि पीपीई किट परिधान केल्यानंतरच तरुणीला वडिलांचं अंत्यदर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली.