#CoronaVirus | आंतरराष्ट्रीय विमाने १४ एप्रिलपर्यंत स्थगित
दिल्ली | करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. याबाबत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नव्याने सूचना जारी केल्या आहेत. करोनाप्रकरणी देशभरात सध्या ‘लॉकडाऊन’ आहे. ते घोषित होण्याआधीच केंद्र सरकारने २४ व २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून सर्व आंतरराष्ट्रीय सेवा स्थगित केल्या. तो निर्णय ३१ मार्चपर्यंत होता.
पण आता या सर्व सेवा १४ एप्रिलपर्यंतच स्थगित असतील, असे ‘डीजीसीए’चे उपमहासंचालक सुनील कुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीला कळवले आहे. यादरम्यान सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा व व्हिसासेवा १४ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत स्थगित असतील. यामध्ये फक्त आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा सुरू असतील, असे ‘डीजीसीए’ने परिपत्रकात म्हटले आहे.