अमेरिकेतील अटलांटा प्राणीसंग्रहालयात गोरिल्लांना करोनाची लागण; करोनाच्या लक्षणानंतर करण्यात आली चाचणी
![Coronary infections of gorillas at the Atlanta Zoo in the United States; The test was performed after coronary symptoms](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/gorilla.jpg)
अमेरिका |
अटलांटा प्राणिसंग्रहालयाच्या माहितीनुसार पश्चिम सखल भागातील गोरिल्लांच्या एका तुकडीमधील अनेकांची करोना चाचणी सकारात्मक आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक गोरिल्लांना सौम्य खोकला, नाक गळणे आणि भूक न लागणे ही लक्षणे प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना दिसून आली होती. त्यानंतर त्या या गोरिल्लांची करोना चाचणी केली असता ती सकारात्मक आली. द हिंदूच्या वृत्तानुसार, अटलांटा प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी या प्राण्यांचे काही नमुने घेतले होते आणि ते जॉर्जिया विद्यापीठातील निदान प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर चाचणीमध्ये या प्राण्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अटलांटा प्राणिसंग्रहालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे.
प्राणिसंग्रहालयाने सांगितले की ते आयोवा येथील राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेच्या चाचणी परिणामांची वाट पाहात आहेत. कारण त्यांना देखील हे नमुने पाठवण्यात आले होते. किती गोरिलांना संसर्ग झाला आहे याची माहिती निवेदनात देण्यात आली नसली तरी अटलांटा जर्नल-कॉन्स्टिट्यूशनने १३ गोरिल्लांची चाचणी सकारात्मक आल्याचे सांगितले आहे. प्राणिसंग्रहालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची टीम प्राणीसंग्रहालयाच्या संपूर्ण गोरिल्लांच्या चाचणीसाठी नमुने गोळा करत आहे. प्राणिसंग्रहालयात चार गटांमध्ये राहणारे २० गोरिल्ला आहेत. अटलांटा जर्नल-कॉन्स्टिट्यूशनचा अहवालानुसार चार प्रत्येक गटामधील गोरिल्लाची चाचणी सकारात्मक आली आहे. एका वर्तमानपत्राच्या अहवालात असे म्हटले आहे की करोना विषाणूने गोरिल्लांमध्ये संक्रमण त्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्याकडून झाले आहे. या कर्मचाऱ्याला लक्षणे नव्हती पण त्याची करोना चाचणी ही सकारात्मक आली होती.