करोना महामारीच्या सावटाखाली हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यास प्रारंभ
![Commencement of Kumbh Mela in Haridwar under the scourge of Corona epidemic](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/kumbhamela.jpg)
हरिद्वार |
देशभरात सुरू असलेल्या करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधांसह उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या तीरावर गुरुवारी कुंभमेळ्याला विधीपूर्वक सुरुवात झाली. मेळावा अधिकारी दीपक रावत, मेळ्याचे महानिरीक्षक संजय गुंज्याल आणि हरिद्वारचे विशेष पोलीस अधीक्षक जनमेजय खंडूरी यांच्यासह कुंभमेळ्याच्या आयोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत गंगा नदीच्या किनारी मंदिरांत पूजा केली. मेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या सीमांवर, उत्तर प्रदेशच्या रुरकीतील नरसन आणि उधमसिंगनगर जिल्ह््यातील काशीपूर येथे कडक तपासणी करण्यात येत आहे. ज्यांच्या आरटी-पीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक आहे अशांनाच प्रवेश देण्यात आहे. ‘आमच्या पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच भाविकांना आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक असणे बंधनकारक आहे,’ असे मेळा अधिकारी दीपक रावत यांनी सांगितले. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल हा जास्तीत जास्त ७२ तासांपूर्वीचा असणे अनिवार्य आहे. तसेच करोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या भाविकांसाठीही हा नियम लागू असून सर्व भाविकांनी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे, उत्तराखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
* उत्तराखंडमध्ये २९३ करोनाबाधित आढळल्यामुळे राज्य सरकारने करोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
* इतिहासात प्रथमच करोनामुळे कुंभमेळ्याचा कालावधी चार महिन्यांऐवजी केवळ एक महिन्याचा करण्यात आला आहे.
* १ ते ३० एप्रिलदरम्यान होणाऱ्या या मेळ्यात १२, १४ आणि २७ एप्रिल रोजी शाही स्नान असणार आहे.
* १३ एप्रिल रोजी असणाऱ्या गुढीपाडवा आणि २१ एप्रिलला असणाऱ्या रामनवमीच्या निमित्तानेही येथे मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. हरिद्वार, डेहराडून आणि टिहरी जिल्ह््यातील अनेक ठिकाणांनी कुंभक्षेत्र व्यापले आहे.
* मेळ्यादरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण १२ हजार पोलीस, निमलष्करी दलाचे ४०० जवान हरिद्वार ते देवप्रयागपर्यंतच्या ६७० हेक्टरमध्ये पसरलेल्या कुंभ क्षेत्रावर लक्ष ठेवतील.
* कुंभमेळ्याच्या भेट देणाऱ्यांसाठी २०० डॉक्टर आणि १५०० पॅरामेडिकल कर्मचारी तैनात असून ३८ तात्पुरती रुग्णालये उभारण्यात आली आहेत.
वाचा- #Covid-19: दैनंदिन रुग्णवाढीचा आज उच्चांक; गेल्या २४ तासांत तब्बल ८१ हजार ४६६ रुग्णांची नोंद