‘विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करणारा अर्थसंकल्प’; पंतप्रधान नरेंद्र मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-25-780x470.jpg)
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा ‘जनतेचा अर्थसंकल्प’ असून तो विकसित भारताचा मार्ग प्रशस्त करणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून प्रसारित केलेल्या भाषणात केले. लोकांच्या पैशांची बचत करण्यावर या अर्थसंकल्पात भर दिला गेला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नसल्याच्या तरतुदीचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
पंतप्रधानांनी शानदार केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. या अर्थसंकल्पाने देशात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील व्यवसायांनाही सहाय्य होईल, असे त्यांनी सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक भारतीयांची स्वप्ने पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासातील आजचा दिवस महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या विकासासाठी आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
हेही वाचा – राज्याच्या अर्थसंकल्पातही मोठ्या घोषणा होणार? बारामतीतील कार्यक्रमातून अजित पवारांनी दिले संकेत
ते म्हणाले, अर्थसंकल्पात सरकारची तिजोरी कशी भरली जाईल, यावरच लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, हा अर्थसंकल्प त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. देशातील नागरिकांचे खिसे कसे भरले जातील, देशातील नागरिकांची बचत कशी वाढेल आणि देशातील नागरिक विकासाचे भागीदार कसे होतील, याचे उदाहरण म्हणजे हा आजचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अत्यंत महत्त्वाची आणि ठोस पावले उचलण्यात आली आहेत. या अर्थसंकल्पात एक नाही तर अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
आज संसदेत सादर झालेला अर्थसंकल्प हा 140 कोटी भारतीयांची स्वप्ने पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेण्याचे काम करतील. या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांची बचत नक्कीच वाढणार आहे. या अर्थसंकल्पामुळे देशातील विकास झपाट्याने वाढेल. ज्यामुळे विकसित भारताच्या ध्येयाला अधिक चालना मिळेल. आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळण्यासाठी नक्कीच फायदा होईल. जनतेची स्वप्ने पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. तरुणांची स्वप्ने पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प देशाची शक्ती वाढवणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढेल. तसेच अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणा कृषी क्षेत्रात आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेत नव्या क्रांतीचा आधार ठरतील. या अर्थसंकल्पातून शेतकर्यांना आणखी मदत मिळेल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.