भाजप जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष- ममता बॅनर्जी
मुंबई |
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढविला. भाजप हा जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष असून त्या पक्षाला राज्यात कधीही सत्तेवर येऊ देऊ नये, असे आवाहन बॅनर्जी यांनी केले आहे. पूर्व मिदनापोर जिल्ह्यातील हल्दिया येथे एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. भाजप हा दंगली घडवत असून लोकांची हत्या आणि दलित मुलींचा छळ करीत असल्याचा आरोपही या वेळी ममतांनी केला. भाजप हा जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष आहे, पीएम केअर्स फंडाच्या नावाने त्या पक्षाने किती रक्कम गोळी केली आहे त्याकडे पाहा, पश्चिम बंगालमधील जनतेला शांतता आणि दंगलमुक्त राज्य हवे असेल तर तृणमूल काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे, असेही ममता म्हणाल्या आहेत.
लोकांच्या हत्या करण्यासाठी जो पक्ष दंगली घडवितो त्या पक्षाला राज्यात कधीही सत्तेवर येऊ देऊ नका, भाजपमधील महिलाही सुरक्षित नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. भाजप लोकशाही पद्धतीने निवडणुका लढू शकत नाही, धमक्या देऊनच त्यांचा उत्कर्ष झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. ममतांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढविला. मोदी यांनी सर्व काही विकले आहे, अर्थव्यवस्थेचा विनाश केला आहे. रेल्वे, कोळसा क्षेत्र, बीएसएनएल, बँका यांचे खासगीकरण केले जात आहे, एके दिवशी हल्दिया गोदीचीही त्यांनी विक्री केलेली असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.





