भिकारी महिलेच्या घरात कोट्यवधी रुपयाचा ऐवज, पोलिसांना मोठा धक्का
रेसिंग बाईकसोबत परदेशी चलन, सोन्या-चांदीचे दागिने आणि बारा मोबाईल पोलिसांना आढळून आले
मुजफ्फरपूर : मुजफ्फरपूरमध्ये चोरी झालेल्या रेसिंग बाईकला ट्रेस करत असताना पोलीस एका भिकारी महिलेच्या झोपडीत पोहोचले. जेव्हा त्यांनी त्या झोपडीमधील दृष्य पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.या महिलेच्या झोपडीमध्ये एका रेसिंग बाईकसोबत, मोठा प्रमाणात परदेशी चलन, सोन्या-चांदीचे दागिने आणि बारा मोबाईल पोलिसांना आढळून आले आहेत. जेव्हा पोलिसांनी या महिलेची चौकशी केली तेव्हा या महिलेनं पोलिसांना असं सांगितलं की हे सर्व सामान माझा जावई चोरून आणायचा आणि इथे माझ्या घरात ठेवायचा. पोलिसांनी या प्रकरणात या महिलेला अटक केली आहे, तिची चौकशी सुरू असून तिचा जावई फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये हाऊसिंग सोसायटी सदस्यांनी गिरवले कायद्याचे धडे!
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना मुजफ्फरपूरच्या करजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मडवन भोज गावातील आहे. रेसिंग बाईक केटीएमचा शोध घेत पोलीस या गावात पोहोचले. ते एका भिकारी महिलेच्या घरात घुसले. तिथे त्यांना या बाईकसह मोठ्या प्रमाणात विदेशी चलन, सोन्या -चांदीचे दागिने आणि बारा मोबाईल आढळून आले.एका भिकारी महिलेच्या घरात एवढ्या वस्तू आढळून आल्यानं पोलिसांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत. नीलम देवी असं या महिलेचं नाव असून तिला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी या महिलेची चौकशी केली, या सर्व वस्तू चोरीच्या असून आपला जावई आपल्याला या सर्व वस्तू आणून देतो असं या महिलेनं सांगितलं आहे.या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला तिचा जावई फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
चुटुक लाल असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो चोरीचं सर्व सामान आपली सासू नीलम देवीच्या घरात ठेवत होता. पोलिसांनी या महिलेच्या घरातून एक केटीएम बाईकसह अर्धा किलो सोन्या-चांदीचे दागिने, विदेशी चलन आणि बारा मोबाईल जप्त केले आहेत. या घटनेबाबत माहिती देताना ग्रामीणचे एसपी विद्या सागर यांनी सांगितलं की, या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं असून, तिची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. तिचा जावई चुटुक लाल हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. त्याचा आणखी काही गुन्ह्यात सहभाग आहे का? याचा शोध घेतला जात आहे.