बँक कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या संपावर
![Bank employees on strike for two days from today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Bank-strike-.jpg)
नवी दिल्ली – आयडीबीआय आणि दोन खासगी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात सरकारने केलेल्या घोषणेच्या विरोधात बँक कर्मचारी आज, १५ मार्चपासून दोन दिवसांच्या संपावर जात आहेत. संपाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून होईल. मंगळवारी (१६ मार्च) रात्री बारापर्यंत हे कामकाज बंद राहील. या संपात बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक अशा सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होत असल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी होईल, असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले.
दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील आणि जुन्या जमान्यातील १२ बँका, खासगी, सहा विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी होत आहेत. या बँका १५० लाख कोटी रुपयांचा म्हणजे एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के व्यवसाय हाताळतात. तसेच या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनस कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी होत आहेत.