बुलडाण्यात ९ महिन्यांमध्ये तब्बल १८५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्ममुक्ती सारखा घोषणा केल्या असल्या तरी शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ही स्थिती अतिशय बिकट आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्येबाबत आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असेलल्या बुलडाण्यात ९ महिन्यांमध्ये तब्बल १८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.
राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट असून अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, खते व कीटकनाशकांसाठी येणारा अतिरिक्त खर्च, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, मुलांचे शिक्षण इत्यादी कारणांमुळे शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली असून यापैकी ३७ शेतकरी कुटुंब पात्र ठरले आहेत, तर ३२ शेतकऱ्यांना मदत देण्यात आली असल्याची माहिती बुलढाण्याचे नायब तहसीलदार संजय बनगाळे यांनी दिली आहे.
कोणत्या महिन्यात किती आत्महत्या?
बुलढाणा जिल्ह्यात या वर्षी जानेवारी महिन्यात २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. तर, फेब्रुवारीमध्ये २४, मार्चमध्ये १९, एप्रिलमध्ये २६, मे महिन्यात २४, जूनमध्ये २२, जुलैमध्ये १९, ऑगस्टमध्ये २४, तर सप्टेंबरमध्ये ३ अशा एकूण ९ महिन्यात १८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहितीही नायब तहसीलदार संजय बनगाळे यांनी दिली आहे.