`दमसा`च्या देवराष्ट्रे संमेलनाच्या अध्यक्षपदी अप्पासाहेब खोत
![Appasaheb Khot as the President of the Devarashtra Sammelan of Damsa](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-05-at-10.54.58-AM.jpeg)
१३ मार्चला यशवंतरावांच्या जन्मगावात साहित्यसोहळा
कोल्हापूर| दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ३२ वे साहित्य संमेलन येत्या १३ मार्च रोजी देवराष्ट्रे (जि. सांगली) येथे होत आहे. ज्येष्ठ कथाकार प्रा. अप्पासाहेब खोत (जाखले, ता. पन्हाळा) यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे संमेलन पहिल्यांदाच यशवंतरावांच्या जन्मगावात होत आहे.
शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, वामन होवाळ यांच्यानंतरच्या पिढीतील महाराष्ट्रातील आघाडीचे कथाकथनकार म्हणून अप्पासाहेब खोत यांची ओळख आहे. गवनेर, महापूर, रानगंगा, कळवंड, माती आणि कागुद, मरणादारी हे कथासंग्रह; पळसफूल, गावपांढर, गावपांढरीच्या वाटेवर, घरपण, फेसाटी, सावलीची सोबत या कादंब-या तसेच अनवाणी पाय, कुणब्याची पोरं हे ललितलेखसंग्रह आणि देवमाणूस हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र अशी ग्रंथसंपदा अप्पासाहेब खोत यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाड्.मयनिर्मिती पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार यांसह राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची आतापर्यंत २६ संमेलने झाली आहेत. ग. ल. ठोकळ, रणजित देसाई, आनंद यादव, वसंत बापट, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, म. द. हातकणंगलेकर, शिवाजी सावंत, प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. फ. मुं. शिंदे, आ. ह. साळुंखे, प्रा. एन. डी. पाटील, वामन होवाळ, लक्ष्मण माने, गौतमीपुत्र कांबळे, अशोक नायगावकर, प्रमोद कोपर्डे, वसंत केशव पाटील, बाबा कदम, अनंत तिबिले, रंगराव बापू पाटील, डॉ. द. ता. भोसले, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. मोहन पाटील, नागराज मंजूळे आदी नामवंत साहित्यिकांनी दमसाच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम, उपाध्यक्ष भीमराव धुळुबुळूू आणि कार्यकारिणी सदस्य दि. बा. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.