#AntiConversionLaw: उत्तर प्रदेशमध्ये महिलेचं धर्मांतर करणाऱ्या तिघांना अटक
![#AntiConversionLaw: Three arrested for converting a woman in Uttar Pradesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/dharmantar.jpg)
उत्तर प्रदेश |
महिलेचं धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही महिला उत्तराखंडमधील असल्याचं समोर आलं असून, तीन जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई केली आहे. धर्मांतर करण्याच्या घटना वाढल्याचं सांगत उत्तर प्रदेश सरकारने धर्मांतर विरोधी कायदा लागू केला होता. या कायद्याखाली तिघांवर कारवाई रविवारी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक संसार सिंग यांनी य़ा घटनेबद्दलची माहिती दिली. धर्मांतर करण्यात आलेली मूळची महिला उत्तराखंडमधील आहे.
प्रलोभन देऊन महिलेचं शहाबाद गावात धर्मांतर करण्यात आलं. महिलेच्या पतीचं निधन झाल्यानंतर आरोपीने तिला दुसऱ्या गावातून शहाबादमध्ये आणलं होतं. आरोपी रिक्षाचालक असून, महिलेच्या नवऱ्याचा मित्र असल्याचं सांगायचा. धर्मांतर विधीनंतर महिलेच्या एका मुलाची प्रकृती बघिडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी धर्मांतरविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी धर्मांतरविरोधी अध्यादेश काढला. या कायद्यात आरोपीला एक ते पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असून, १५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.