भुजबळ चौकात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 30 किलो गांजा पकडला
![Anti-drug squad seized 30 kg of cannabis at Bhujbal Chowk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/ganja-arrest.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भुजबळ चौक वाकड येथे 30 किलो गांजा पकडला. यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 21) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.बाळू महादेव वाघमारे (वय 31, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड), रवींद्र प्रकाश घाडगे (वय 23, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड. मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ चौकात दोघेजण प्रवासी बॅगमध्ये गांजा घेऊन आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भुजबळ चौकात जुना जकात नाका येथून बाळू आणि रवींद्र यांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या प्रवासी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला.
पोलिसांनी दोघांकडून सात लाख 54 हजार 575 रुपये किमतीचा 30 किलो 180 ग्रॅम गांजा जप्त केला. बाळू आणि रवींद्र हे वेगवेगळ्या प्रवासी बॅगमध्ये गांजा आणून त्याची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दोघांवर एनडीपीएस ऍक्ट कलम 8 (क), 20 (ब)(।।) (क), 29 नुसार गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.