अॅमेझॉनकडून मोठी घोषणा! भारतात देणार २० लाख नोकऱ्या
![Amazon will provide 2 million jobs in India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/amazon-job-780x470.jpg)
Amazon Job : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौर्यामुळे भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतनणूक झाली आहे. आता ई-कॉमर्स कंपनी Amazon ने भारतात ४-५ लाख नव्हे तर २० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. देशाचे आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, अॅमेझॉन इंडियाकडून मोठ्या गुंतवणुकीसाठी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. या अंतर्गत २०३० पर्यंत भारतात २६ अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि २० लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया सोबतच अमेरिका-भारत तंत्रज्ञान भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक पाऊल ठरेल.ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या अधिकार्याने सांगितले की, कंपनी भारतात अतिरिक्त १५ अब्ज डॉलर गुंतवण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे कंपनीची भारतातील एकूण गुंतवणूक २६ अब्ज डॉलर होईल.
हेही वाचा – अल्पवयीन मुलगा-मुलगी गाडी चालविताना आढळल्यास पालकांना २५ हजार रूपये दंड
अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी म्हणाले की कंपनीने भारतात आधीच ११ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. ते शुक्रवारी म्हणाले होते की, मी पंतप्रधान मोदींसोबत खूप चांगले आणि अर्थपूर्ण संभाषण झाले आणि मला वाटते की आमची अनेक उद्दिष्टे समान आहेत. Amazon भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे.