तोतया अजित पारसेने घातला वकिलांना गंडा, आमिष दाखवून लाखोंनी फसवणूक
![Ajit Parse pretended to cheat lawyers, cheated lakhs by showing bait](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/ajit-parse-780x470.jpg)
नागपूर : स्वयंघोषित मीडिया विश्लेषक अजित पारसे याने व्यापारी, प्राध्यापक, व्यावसायिक आणि धनाढ्य महिलांनाच नव्हे तर चक्क कायदेतज्ज्ञ असलेल्या दोन वकिलांनाही वेगवेगळी आमिषे दाखवून लाखोंनी फसवणूक केल्याचा कारनामा उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस चौकशी करीत असल्याची माहिती आहे.
कायद्याची पुरेपूर माहिती आणि तज्ज्ञ समजल्या जाणाऱ्या दोन वकिलांना तोतया पारसेने जाळ्यात ओढले. त्याला सीएसआर फंड आणि पंतप्रधान कार्यालयात मोर्चेबांधणी करून कोटींमध्ये निधी मिळवून देण्याच्या नावावर जाळ्यात अडकले. पारसेकडे जवळपास सर्वच शासकीय विभागाचे बनावट रबरी शिक्के आणि लेटरपॅड होते. त्यामुळे त्या दोन वकिलांना पारसेने बनावट कागदपत्रे आणि शासकीय कार्यालयाचे पत्र दाखवून लाखोंनी फसवणूक केल्याची माहिती आहे. अजित पारसेने बडकस चौकातील डॉ. राजेश मुरकुटे यांनासुद्धा महाविद्यालय काढण्याच्या नावाने आणि सीबीआयची कारवाई रोखण्यासाठी तब्बल ४.५ कोटींनी फसवणूक केली होती. पारसेचे संतुलन बिघडल्याचे सांगून त्याला अटकेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. यादरम्यान तो न्यायालयात जाऊन जामिन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्य प्रणालीवरही संशय निर्माण झाला आहे.
पारसेच्या घराला जप्तीची नोटीस
महाठग अजित पारसेने बँकेतून कर्ज काढून राऊतवाडीमध्ये सदनिका घेतली आहे. त्याच्यावर २६ लाखांपेक्षा जास्त रक्कम थकबाकी आहे. गेल्या सात महिन्यांपासून पारसेने सदनिकेचे हप्ते थकवले आहे. त्यामुळे बँकेने त्याच्या राऊतवाडील सदनिकेला जप्तीची नोटीस लावली आहे. त्यामुळे पारसेने पैसे न भरल्यास त्याची सदनिका जप्त करून लिलावात विक्री होण्याची शक्यता आहे.