राजुरा येथे एक देशी कट्टा, चार जिवंत काडतूस जप्त
राजुरा-असिफाबाद मार्गावरील न्यू इरा कॉन्व्हेन्टच्या मागे एका व्यक्तीला एक देशी कट्टा आणि चार जिवंत काडतूसची विक्री करताना पोलिसांनी पकडले. लोऊजीत सिंग देवल (२१) या असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र, देशी कट्टा आणि चार जिवंत काडतूसे विकत घेणारा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. या कारवाईमुळे मोठा घातपात टळल्याचे बोलले जात आहे.
राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे असल्याची माहिती असून कोळसा तस्करीतील वादामुळे मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपासात आणखी माहिती उघडकीस येईल. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती ठाणेदार संतोष दरेकर यांनी दिली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, राजुराचे ठाणेदार संतोष दरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी खुशाल टेकाम, किशोर तुमराम, रवी नक्कनवार, संदीप बुरटकर, तिरुपती जाधव रामा मिगेवार यांनी केली.