हिमाचल प्रदेशमध्ये कारखान्यातील स्फोटात सात महिलांचा होरपळून मृत्यू
![A factory blast in Himachal Pradesh kills seven women](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Baghdad-Blast.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यात एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन सात महिलांचा होरपळून मृत्यू झाला, तर १० ते १५ महिला जखमी झाल्याचे कळते. परिसरात सकाळी साडे अकराच्या सुमारास स्फोटाचे मोठे आवाज आले, त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि प्रशासकीय अधिकारी व स्थानिकांच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना ऊना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेतील सर्व मृत महिला उत्तर प्रदेशच्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र प्रशासनाकडून मृत महिलांबाबत कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नव्हती. वेदनादायी बाब म्हणजे, मृतांमध्ये एका तीन वर्षीय मुलीचाही समावेश असून कामगार असलेल्या आपल्या आईबरोबर ती कारखान्यात आली होती. परंतु कारखान्यातील स्फोटात तिलाही जीव गमवावा लागला. जखमींपैकी एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कारखान्यात ३० ते ३५ कर्मचारी काम करत होते.
तसेच या प्रकरणात स्थानिक ग्रामपंचायतीतील महिला सरपंचांनी या कारखान्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतेही ना हरकत पत्र घेण्यात आले नव्हते. हा फटाक्यांचा कारखाना बेकायदेशीर होता, असा दावा केला आहे.