देशात ३९,७४२ नवे कोरोना रुग्ण; ३९,९७२ कोरोनामुक्त
![39,742 new corona patients in the country; 39,972 coronal free](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-5174671_1920-1-5.jpg)
नवी दिल्ली – देशात दैनंदिन कोरोना रुग्णवाढीत चढउतार पाहायला मिळत आहेत. काल दिवसभरात आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ही किंचित जास्त असल्याचे दिसून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात शनिवारी ३९ हजार ७४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ३९ हजार ९७२ रुग्ण कोरोनातून बरे झाले, तर ५३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी १३ लाख ७१ हजार ९०१ वर पोहोचला आहे. त्यापैकी ३ कोटी ५ लाख ४३ हजार १३८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ४ लाख २० हजार ५५१ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे, तर सध्या ४ लाख ८ हजार २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर देशात आतापर्यंत ४३ कोटी ३१ लाख ५० हजार ८६४ व्यक्तींचे कोरोना लसीकरण झाले आहे.
यावर्षी एप्रिल ते मे महिन्यादरम्यान देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अक्षरशः कहर झाला होता. काही काळ दररोज ४ लाखांहून जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत होती. मात्र हळूहळू दुसरी लाट ओसरायला लागली, त्यामुळे आता हा आकडा ४० हजारांच्या आत आहे. मात्र असे असले तरी आपल्याला बेजबाबदार राहून चालणार नाही. तज्ज्ञांकडून सातत्याने वर्तविण्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे आपण सर्वांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.