भारतात 24 तासांत 2,40,842 नवे कोरोना रुग्ण; 3,741 कोरोनाबळी
![Karona 41 children in the ashram school for mentally retarded children on Tuesday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-2.jpg)
नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरश: कहर माजवला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश आणि दिल्लीपाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनाने हातपाय पसरले असून दररोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. यंदा २१ एप्रिलला देशात पहिल्यांदाच दिवसभरात तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतात आढळलेली ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. धक्कादायक बाब म्हणजे या दिवसानंतर भारतात दररोज ३ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत होती. तर ६ मेपासून भारतातील दैनंदिन रुग्णसंख्येने ४ लाखांचा टप्पा पार केला होता. मात्र १० मेपासून ही संख्या ४ लाखांच्या आत आहे.
देशात मागील 24 तासांत तब्बल 2,40,842 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3,741 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 2,65,30,132 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 2,99,266 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 3,55,102 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 2,34,25,467 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 28,05,399 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. तर २२ एप्रिलला दैनंदिन रुग्णवाढीने तब्बल ३ लाखांचा टप्पा ओलांडला आणि ६ मे रोजी ४ लाखांचा टप्पा पार केला. त्यामुळे चिंता प्रचंड वाढली आहे. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू असले, तरी देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या २ कोटींच्या पार असल्याने सर्वांनी आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.