हैद्राबाद एन्काऊंटरच्या चौकशीची जबाबदारी मराठी अधिका-याकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/telangana-marathi-police2.jpg)
- एन्काऊंटर केलेल्या पोलिसांच्या याचिकेवर होणार 11 डिसेंबर रोजी सुनावणी
दिल्ली| महाईन्यूज| हैद्राबादमध्ये एका डॉक्टर युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिला जिवंत पेटवून देणाऱ्या चौघा नराधमांचा गेल्या शुक्रवारी सकाळी हैदाराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या आरोपींच्या एन्काऊंटरच्या चौकशीसाठी तेलंगाना सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या एसआयटीचे प्रमुख म्हणून रचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश एम. भागवत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भागवत हे मराठी आयपीएस अधिकारी असून ते रचकोंडाचे पोलिस आयुक्त म्हणून काम करत आहेत.पोलिस आयुक्त महेश एम. भागवत यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटीमध्ये त्यांच्यासह आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हैदराबाद एन्काऊंटरमध्ये चार आरोपींना ठार केल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली. त्यांच्या ७ सदस्यीय पथकाने बलात्कार झालेले ठिकाणी आणि पोलिसांनी केलेला एन्काऊंटर या दोन्ही ठिकाणांची गेल्या शनिवारी पाहणी केली. दरम्यान, एन्काऊंटरविरोधातही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच तेलंगाना उच्च न्यायालयात आज म्हणजेच दि.९ डिसेंबरला आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणी सुनावणी होणार आहे. याआधी न्यायालयाने एन्काऊंटरमधील आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र या याचिकेवर सुनावणी 11डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.नेनू साईथम संस्थेचे अध्यक्ष डी प्रवीण कुमार यांनी अप्पल पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केलेल्या कामगिरीचे सर्वत्रच कौतुक केले जात असेल तरी काही जणांकडून या एन्काऊंटरवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत. हैदराबादमधून पोलिसांच्या भूमिकेचे नागरिकांकडून जोरदार स्वागत होत असले, तरी काहींनी याला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान ही सुनावणी नक्की कोणाच्या बाजूने लागणार हे पाहण आता नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे.