स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/US-PARISHAD.jpg)
कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९वी ऊस परिषद आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक परिषदा या ऑनलाईन घेतल्या जात आहेत. परिषदेच्या परवानगीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यात आज (३० ऑक्टोबर) चर्चा झाली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार ऊस परिषद आता २ नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर होण्याऐवजी आता कल्पवृक्ष गार्डन हॉल येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या २ नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्याबाबतची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या परिषदेसाठी परवानगी दिली नव्हती. त्यांनतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चेनंतर परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.