सीबीएसई बोर्डाचे बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर
![X-XII exams will be held offline as per schedule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Exam_12-696x447-1.jpg)
नवी दिल्ली – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनने बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईने जारी केलेल्या माहितीनुसार, बारावी 2021 च्या प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहेत. दरम्यान, या तारखा संभाव्य असल्याचंही सीबीएसईच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसेच बोर्डाच्या वतीने निश्चित तारखांसंदर्भातील सूचना लवकरच अधिकृत वेबसाइटवर जारी केल्या जातील, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तारखांसोबतच परीक्षांची नियमावलीही जारी केली आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी सीबीएसई बोर्डाने नियमावली जारी केली आहे. ज्यामध्ये प्रॅक्टिकल परीक्षांसाठी एक ऑब्जर्वर देखील नेमण्यात येणार आहे. हा ऑब्जर्वर प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट्सच्या मूल्यांकनावर लक्ष्य ठेवणार आहे.
माहितीनुसार, गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्हीही परीक्षक असणार आहेत. तसेच सीबीएसई बोर्डाने नियुक्त केलेल्या या एक्सटर्नल एग्झामिनर्सकडूनच प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांचीच असेल. यंदा सर्व शाळांना एक लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या लिंकवर शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यांचे गूण अपलोड करावे लागणार आहेत. प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट मूल्यांकनाचे काम संबंधित शाळांमध्येच पार पडणार आहे.
सीबीएसई 10 वी 12 वी बोर्डाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
सीबीएसई 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा लवकरचं जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. मात्र यावर बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी याबाबतच वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे.