सिंचन घोटाळ्यातील अजित पवारांविरोधातील चौकशीच्या फाईली बंद
![Accelerate the recruitment process of the Public Service Commission; The posts of the commission will be filled till July 31](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/ajit-pawar-news.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट दिल्याची माहिती समोर येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) अजित पवार यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्यातील ९ प्रकरणांच्या चौकशीच्या फाईली बंद करण्यात आल्याचे समजते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकारणात अजित पवार जलसंपदा मंत्री असताना झालेला सिंचन घोटाळा चांगलाच गाजला होता.
यावरून भाजपसह विरोधकांकडून अनेकदा अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्यही करण्यात आले होते. विरोधी पक्षात असताना भाजपचे नेते सिंचन घोटाळ्याचे पुरावे म्हणून बैलगाडीभर कागदपत्रे घेऊन विधिमंडळाच्या आवारात आले होते. आम्ही सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांना तुरुंगात धाडू, अशा वल्गनाही त्यावेळी भाजप नेत्यांकडून करण्यात आल्या होत्या.
मात्र, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत अजित पवार भाजपच्या गोटात दाखल झाल्यानंतर परस्थिती पूर्णपणे पालटली आहे. ऐन मोक्याच्या क्षणी भाजपला साथ दिल्याबद्दल अजित पवारांना हे पहिले बक्षीस मिळाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यावरील आरोप टप्याटप्प्याने मागे घेत त्यांना क्लीन चीट देण्यात येईल.
राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक गट फोडून भाजपला साथ देण्याचे ठरवले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आम्ही शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे सांगत असले तरी बहुमताच्या परीक्षेवेळी सभागृहात या आमदारांच्या निष्ठा कायम राहतील का, याबाबत अजूनही शंका आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अजूनही अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.