‘सर्वांना सीमेवरचं सत्य माहित आहे’ पण…शायरीमधून राहुल गांधींचा अमित शाहंना टोला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शायरीच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. चीन बरोबर सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करताना एक विधान केले होते. त्यावरुन राहुल गांधींनी अमित शाह यांना लक्ष्य केले आहे.
“भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे” असे विधान अमित शाह यांनी बिहारमधील डिजीटल सभेला संबोधित करताना केले होते. अमित शाह यांचे हे विधान टि्वटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 8, 2020
दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।https://t.co/cxo9mgQx5K
सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. दोन्ही बाजुंनी चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढण्याचे ठरवले आहे.
चीननं भारताला चिथवलं
पूर्व लडाखमध्ये एलएसीवर तणाव कमी करण्याच्या गोष्टी चीनकडून सुरू असल्या तरी चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. काही भारतीयांमुळे देशात चीन विरोधी भावना निर्माण होत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या एका लेखातून करण्यात आला आहे. “सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूबूजून केला जात आहे. चीनची उत्पादनं सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणं कठिण आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल,” असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे. सध्या भारतात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तू वापरण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.





