सणासुदीसाठी रेल्वेकडून भेट, २०० विशेष रेल्वे गाड्या चालवणार
![Why aren't passes given to those who travel to Mumbai every day from Pune and Nashik ?, Mumbai High Court asks](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/train-3.jpg)
नवी दिल्ली | देशात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच, सणासुदीच्या काळात अनेकजण प्रवास करत असतात. त्यामुळे या कोरोनाच्या दिवसांत प्रवासावर मर्यादा येऊ नये याकरता रेल्वेकडून १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान २०० विशेष रेल्वे गाड्या चावण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हि. के. यादव यांनी दिली. सध्या रेल्वेची नियमित प्रवासी वाहतूक बंद आहे.
सर्व विभागीय व्यवस्थापकांना आपापल्या भागातील स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून कोरोनास्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. तूर्त दोनशे गाड्या सुरू करण्याचे नियोजन आम्ही केले आहे, प्रत्यक्षात कदाचित यापेक्षा अधिक गाड्याही सुरू होऊ शकतात. राज्य सरकारांच्या गरजेनुसार प्रवासी वाहतुकीचा दैनंदिन आढावा घेण्याचा निर्णयही रेल्वेने घेतल्याची माहिती यादव यांनी दिली.
जेथे गरज असेल, तेथे प्रवासी गाड्या सुरू केल्या जातील, असे ते म्हणाले. सध्या सुरू असणाऱ्या गाड्यांच्या पुरवणी गाड्यांचे (क्लोन ट्रेन) भारमानही साठ टक्क्यांच्या आसपास असल्याची माहितीही यादव यांनी दिली. जेथे पुरवणी गाड्याही भरतील, अशा ठिकाणी प्रतीक्षा यादी संपुष्टात आणण्यासाठी आणखी गाड्या सोडण्याचीही योजना आहे.
सध्या सुरू असणाऱ्या गाड्या
– राजधानी विशेष गाड्यांच्या १५ जोड्या
– लांब पल्ल्याच्या १०० गाड्या एक जून रोजी सुरू
– १२ सप्टेंबरपासून आणखी ८० गाड्या सुरू