वृंदावनमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट; इस्कॉन मंदिराचे पुजारीसह 22 जणांना कोरोनाची लागण

सध्या देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा होत आहे. वृंदावन मध्ये तर या उत्सवाला विशेष महत्व आहे. मात्र आता या उत्सवावर कोरोना विषाणूचे सावट असलेले दिसून येत आहे. उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथील इस्कॉन मंदिराचे पुजारी यांच्यासह 22 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर मंदिर सील करण्यात आलय. मंगळवारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण मंदिर बंद करण्यात आलं आहे. 12 ऑगस्ट रोजी इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा होणार होता.
जन्माष्टमीच्या उत्सवा दरम्यान होणारी गर्दी थांबविण्याच्या सूचना प्रशासनाने यापूर्वीच मंदिरांना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरकारने लॉकडाऊन उघडण्यास सुरुवात केली आहे. या भागामध्ये भाविकांना दर्शनासाठी मंदिरे उघडली आहेत. मात्र मंदिर प्रशासनाने कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार मंदिरांमध्ये मास्क घालूनच परवानगी दिली जाणार आहे.
तसेच, हात स्वच्छ करणे आणि सामाजिक अंतर पाळणे अशा गोष्टी सुनिश्चित केल्या जातील. मात्र आता इस्कॉन मंदिरातच कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याने मंदिर सील केले गेले आहे.





