विमानातील मधली सीट रिकामी न ठेवता, प्रवाशाला प्रोटेक्टिव्ह गाऊन देणार…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/air-india-new-759.jpg)
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासादरम्यान विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्याची मागणी करणारी एअर इंडियाच्या वैमानिकांनी मुंबई उच्च न्यायालयाला विनंती केली होती…मुंबई उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावत यावर एक मार्ग सुचवला आहे…
डीजीसीएच्या २३ मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे सुरक्षित वावरासाठी विमानातील तीन आसनांपैकी मधले आसन रिक्त ठेवण्याचे निर्देश असतानाही परदेशांत अडकलेल्या भारतीयांना आणण्याच्या ‘वंदे भारत मिशन’मध्ये एअर इंडियाकडून त्याचे उल्लंघन झाले, असा आक्षेप एअर इंडियाचे वैमानिक देवेन कयानी यांनी अॅड.अभिलाश पनिकर यांच्यामार्फत याचिका दाखल करून नोंदवला होता. त्यावर आज सुनावणी झाली.
‘कोरोनाबाधित व्यक्तीचा केवळ स्पर्श झाला म्हणून कोणाला कोरोनाचा संसर्ग होत नाही. मधल्या सीटवरील प्रवाशाला प्रोटेक्टिव्ह गाऊन दिल्यास हा धोका टळू शकतो … तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी ही तडजोडही नसेलं, असे निरीक्षण नोंदवून मधली सीट रिकामी ठेवण्याचा आदेश देण्याची एअर इंडियाच्या वैमानिकाने केलेली विनंती उच्च न्यायालयाने आज फेटाळली.
‘हवाई प्रवासात विमानांमध्ये मधली सीट रिकामी न ठेवता त्या सीटवरील प्रवाशाला प्रोटेक्टिव्ह गाऊन पुरवण्यासह प्रवाशांना फेस शिल्ड, मास्क इत्यादी देण्याचे तसेच सुरक्षिततेचे अन्य उपाय करण्याच्या डीजीसीएने ३१ मेच्या परिपत्रकाद्वारे दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करा, असे निर्देशही यावेळी न्यायालयानं विमान कंपन्यांना दिले.