वादग्रस्त पुस्तकानंतर आता मॉर्फ केलेला वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; खासदार संभाजीराजेंचा मोदी सरकारला इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/SambhajiRaje.jpg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमिकवर अभिनेता अजय देवगण आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात चित्रपटातील काही प्रसंगाला मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाहंचा चेहरा लावण्यात आलेला आहे. यावरुन खासदार संभाजीराजे यांनी ट्वीट करत या व्हिडीओबाबत नाराजी व्यक्त करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
याआधी ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. भाजपच्या एका नेत्याने या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली होती. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पुस्तकामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. राज्यभर याचे तीव्र प्रतिसाद उमटले, शेवटी भाजपने हे वादग्रस्त पुस्तक मागे घेतले होते, त्यानंतर आता या व्हिडिओमुळे राज्यात परत एकदा वाद पेटला आहे.
याबाबत संभाजीराजे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, “पुस्तक झालं आता व्हिडीओ आला आहे. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी”, असे म्हणत संताप व्यक्त केलेला आहे.