वर्षभरात नागपुरात ४४ हजारांहून अधिक वाहनधारकांनी तोडले ‘सिग्नल’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/TRAFFIC-pilice.jpg)
नागपूर | महाईन्यूज
चौकातील वाहतूक सिग्नलवर पोलीस असतील तरच नियम पाळायचा, नाहीतर तोडायचा, असे धक्कादायक चित्र शहरातील आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २०१८ मध्ये झालेल्या १११७ अपघातात २३७ तर २०१९ मध्ये १००७ अपघातात २५० जणांचा मृत्यू झाला. असे असतानाही वाहतूक नियमांना बगल देण्याची प्रकरणे कमी होण्यापेक्षा वाढतच आहेत. गेल्या वर्षी, २०१९ मध्ये ४४ हजार ७८ चालकांनी सिग्नल तोडलेले आहेत.
वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. सिग्नल तोडल्यावर सापडल्यास अत्यंत किरकोळ दंड होतो. वाहनचालकांना त्याचे गांभीर्य वाटत नसल्याचेही दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, २०१८ मध्ये २८ हजार ७६७ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडले. तर २०१९ मध्ये हा आकडा ४४ हजारावर पोहचला आहे. यात ६० टक्के युवक-युवती असल्याचे समोर आले आहे. दोषींवरील कारवाईत शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असला तरी सिग्नल तोडणे हे प्राणांतिक अपघातासाठी कारणीभूत ठरते, याला गांभीर्याने घेत नसल्याचे वास्तव आहे.