लष्कराच्या इफ्तार पार्टीवर काश्मीरात दगडफेक
- जवानांच्या गोळीबारात चार मुली जखमी=
श्रीनगर – काश्मीरात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशान लष्कराच्यावतीने शोपिया जिल्ह्यात डीकेपुरा येथे स्थानिक नागरीकांसाठी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तेथे अभुतपुर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली. स्थानिक नागरीकांनी लष्कराची ही इफ्तार पार्टी नाकारून तेथे सरळ लष्करी जवानांवरच दगडफेक सुरू केली. या दंगेखोरांना आटोक्यात आणण्यासाठी लष्करालाही तेथे गोळीबार करावा लागला. त्याच चार स्थनिक मुली जखमी झाल्या आहेत.
लष्कराने इफ्तार पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात बिर्याणी तयार केली होती. त्याचे वाटप सुरू होतानाच हा गोंधळ उडाला. स्थनिकांनी ही बिर्याणी स्वीकारण्यास नकार देत लष्करावर दगडफेक सुरू केल्याने तेथे मोठाच गोंधळ उडाला. त्याची व्याप्ती वाढत गेल्यानंतर जवानांना गोळीबार करावा लागला. त्यात 15 ते 17 वयोगटतील चार मुली जखमी झाल्या.
हा प्रकार दुर्देवी आहे अशी प्रतिक्रीया राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी वैद यांनी दिली. ते म्हणाले की लष्कराने सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता तेथे असे व्हायला नको होते.
लष्करानेही या कार्यक्रमाचे नीट नियोजन केले नव्हते. त्यांनी लष्करी कॅम्प मध्येच ही इफ्तार पार्टी आयोजित करायला हवी होती असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीरात लष्करी जवान आणि स्थनिक नागरीक यांच्यातील संबंध पुर्वी कधीही नव्हते इतके खराब झाले आहेत. आता तेथे लहान मुलीेही जवानावर दगडफेक करू लागली आहेत. दहशतवाद्याच्या विरोधातील कारवाईच्यावेळीही जवानांवर दगडफेक करून त्यात अडथळे आणले जात असल्याचे जवानांना सध्या आव्हानात्मक स्थितीला तोंड द्यावे लागत आहे.