राष्ट्रवादीच्या आमदाराला वाढदिवस साजरा करणं पडलं महागात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Sangram-Jagtap.jpg)
अहमदनगर | सोशल डिस्टन्सिंगचे नियम तोडून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह त्यांच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात कलम १८८ आणि २६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान वाढदिवस साजरा करणं संग्राम जगताप यांना चांगलंच महागात पडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१२ जून) संग्राम जगताप यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते एकत्र जमले होते. याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले गेले नाही. मास्क न लावता एकत्र येऊन कोरोना आजारासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार संग्राम जगतापसह त्यांच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या विळख्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचेच आमदार सर्व नियम धाब्यावर बसून वावरत असतील तर त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? असा सवाल आता विचारला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन करत आहेत.