मुस्लिमांना सन्मान देणारा भाजप कोण?: ओवैसी
नवी दिल्ली: ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ‘आम्हाला भारतीय राज्यघटनेने अधिकार दिले आहेत. तुम्ही नव्हे. तुमचे काम आमच्या अधिकारांची अंमलबजावणी करणे हे आहे. ही लोकशाही आहे. आम्हाला वाटले तर आम्ही तुम्हाला मत देऊ, जर वाटले नाही तर देणार नाही.’ अशा शब्दात ओवैसी यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर यांना उत्तर दिले आहे.
‘मुस्लिम जनता भाजपला मतं देत नाही, पण आम्ही नेहमीच त्यांचा योग्य सन्मान केला आहे’, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषेदत आज सकाळी केले होते. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काँग्रेस पक्षाने देखील रविशंकर यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले आहे. रविशंकर यांचे वक्तव्य अविवेकावर आधारेले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ‘आपल्याला कोणी मत दिेले नाही याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि ती उणीव भरून काढली पाहिजे. यात ‘सन्मान’ ही संकल्पना कुठून आली मला काही कळत नाही’. अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ता सलमान खुर्शीद यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यावर टीका केली आहे.