मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शिर्डीकर नाराज, साईबाबांबद्दलचा उल्लेख खटकला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Udhav-Thakarey.jpg)
शिर्डी | साईबाबांनी हयातीत कधीही जन्मस्थळ, जात, धर्म उघड केला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्हयातील पाथरीचा विकास करणार’ असा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्त नाराज झाले आहेत.
यापूर्वी राष्ट्रपतींनी साईसमाधी शताब्दी सोहळ्यात साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. यावर नाराज झालेल्या शिर्डीकरांनी थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थळाचा खुलासा केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीच थेट साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. पाथरीच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र पाथरी या गावाचा ‘साईबाबांचे जन्मस्थान’ असा उल्लेख करणे आक्षेपार्ह असल्याचे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे, असे शिर्डीकरांचे मत असल्याचे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे साईबाबांचे भक्त आहेत, त्यांनी शिर्डीकरांच्या या भावना जाणून घ्याव्यात, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यासंबंधीची भूमिका गावकऱ्यांनी शनिवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.