मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी 17 जून उजाडेल; यंदा वळीवचा पाऊसही गायब
![Pre-monsoon rains continue in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/monsoon-11-696x447.jpg)
पुणे – मान्सून कधी बरसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी मान्सूनपूर्वी बरसणारा वळीव यंदा गायब झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपत आले तरी वळीव बरसला नाही. खूप वर्षांनी असे घडले आहे. मान्सून साधारण केरळमध्ये 6 जूनला आणि त्यानंतर सात दिवसांनी महाराष्ट्रात दाखल होतो. तो महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी 17 जून उजाडेल. यंदा 1972 सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून मान्सूनपूर्वी होणारा वळीव नाही, अशी माहिती हवामान विभागाचे अभ्यासक, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली.
साधारणपणे मेच्या तिसर्या आठवड्यात एक वळिवाचा पाऊस होत असतो. या वर्षी मात्र मे संपला, रोहिणी नक्षत्रही 1 जूनला संपत आहे तरी वळीव बरसण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. याविषयी माहिती देताना डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, वळीव बरसला नाही, कारण उत्तरेकडून कोरडे वारे वाहू लागले. त्यामध्ये बाष्प नसल्याने वळिवाचा पाऊस झालेला नाही. शिवाय कमाल तापमानही यंदा दरवर्षीपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअसने जास्त आहे. त्यामुळे वार्यांमध्ये बाष्प, आर्द्रता नाही. वळीव होण्यासाठी कोणतीच अनुकूल स्थिती नसल्याने तो बरसला नाही.
यंदा एल निनोची स्थिती सामान्य आहे. मान्सून सक्रिय राहण्यासाठी समुद्राचे तापमान, हवेचा वेग असे विविध घटक कारणीभूत असतात. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी 28 ते 29 डिग्री असते. हिंद महासागराच्या पूर्व भागाचे तापमान 1 अंशाने कमी आणि पश्चिम भागाचे तापमान एक अंशाने जास्त असावे लागते. मान्सून पुढे जाण्यासाठी वार्याचा वेगही योग्य असावा लागतो. आता तशी स्थिती नाही. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
पेरणी करताना घाई करू नका
या वर्षी मान्सून 6 जूनला तो केरळमध्ये दाखल होईल असा जरी अंदाज असला तरी तो प्रत्यक्ष येण्यासाठी 10 जूनही उजाडेल. त्यानंतर महाराष्ट्रात तो 17 जूनपर्यंत येईल अशी स्थिती दिसते आहे. त्यामुळे धरणसाठा जपून कापरण्याबरोबरच शेतकर्यांनी शेतीची कामे करताना पेरणीची घाई करू नये. पाऊस झाल्यास तो 1 सेंटिमीटरच्या आसपास राहील. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठीदेखील उपयुक्त नाही, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. यापूर्वी 1972 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा पाऊस 19 जूनला आला होता. ही स्थिती निर्माण होईल. त्याकडे लक्ष ठेवूनच शेतकर्यांनी पेरणी करावी.