महापालिका निवडणुकीसाठी ‘टीम लांडे’ सक्रीय; स्थानिक मुद्यांवर प्रशासनाला आव्हान!
![Misleading the citizens by the ruling BJP under the name of 'Vaccine Festival' - Vilas Lande](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Lande.jpg)
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची डोकेदुखी वाढणार?
समर्थक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा बैठका- निवेदनांचा सपाटा
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘शरद पवार’ अशी ओळख असलेले माजी आमदार विलास लांडे यांची ‘टीम’ आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रीय झाली आहे.
स्थानिक मुद्यांवर महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांना ‘टीम लांडे’च्या माध्यमातून धारेवर धरले जात आहे. त्यातच आता संघटनात्मक पातळीवर पक्षात वर्चस्व निर्माण करण्यासाठी ‘टीम वर्क’ महत्त्वाचे असल्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत.
मध्यमंतरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महापालिका भवनातील कोरोना वॉररुमला भेट दिली. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे त्यांच्यासोबत होते. विशेष म्हणजे, पवारांनी स्वत: फोन करुन लांडेंना पालिकेत उपस्थित राहण्याबाबत सूचना दिली होती. तसेच, ‘आता सक्रीय व्हा…’ असा विश्वासही दिला आहे.
दरम्यान, माजी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक नगरसेवक अजित गव्हाणे यांनी ‘अर्बन स्ट्रिट’ वरुन प्रशासनाला चुका निदर्शनास आणून दिल्या. त्यासंदर्भात झालेल्या बैठकीत भाजपाचे नगरसेवक रवि लांडगे उपस्थित होते. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कारण, रवि लांडगे यांना २०१७ च्या निवडणुकीत बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांचा मोलाचा वाटा आहे, असे बोलले जाते.
यासह भोसरीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि संघटनेतील पदाधिकारी यांचाही समन्वय तगडा असून, नगरसेवक प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे यांच्यासह धनंजय भालेकर, उत्तम आल्हाट, शहर उपाध्यक्ष अतिष बारणे, युवक राष्ट्रवादीचे योगेश गवळी, मा. शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे आदी समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
****
नगरसेवक विक्रांत लांडे यांचाही यशस्वी पाठपुरावा!
भोसरी- इंद्रायणीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी रोहित्राच्या स्फोटामुळे तीघांचा बळी गेला. यापार्श्वभूमीवर नगरसेवक विक्रांत लांडे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांची तात्काळ बैठक घेतली. तसेच, शहरातील सर्वच धोकादायक रोहित्रांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व घटनांमधून ‘टीम लांडे’ आता सक्रीय झाल्याचे अधोरेखित होत आहे.