‘महाईन्यूज’ व्यक्तीविशेष : ‘डिझाईन’क्षेत्रातील ‘विनय’शील ‘इनोव्हेटर’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/c651c7ac-a295-4381-8750-35f234bbc619.jpg)
– मृदूस्वभावी विनय रावळ यांची प्रेरणादायी वाटचाल
– राजकीय क्षेत्रातील ‘ब्रँड’ निर्माण करणारा अवलीया
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबिरराव मोहीते यांची जन्मभूमी…त्यामुळे माती आणि संस्कृतीशी असलेली बांधिलकी…वडील गोविंद शंकर रावळ यांची बँकेतील प्रतिष्ठीत नोकरी…त्यामुळे घरी अत्यंत सुशिक्षित आणि शिस्तीचे वातावरण…आई गृहणी मात्र… महिलांना एकत्र करुन उद्योजकतेची कास धरायला लावणारी कुशल मार्गदर्शिका…खरंतर रांगोळी, हस्तकला आणि गृहपयोगी साधणे बनवणारी कारागीरच…कराडजवळील उंब्रजसारख्या ग्रामीण भागातील बालपण…तरीही धोपटमार्गाने शिक्षण न करता कला क्षेत्रात मुलाने भविष्य घडवावे, अशी अपेक्षा दोघांचीही… वडीलांची शिस्त आणि आईमधील कलावंताचा वारसा अगदी अभिमानाने जोपासणारे पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातील ‘डिझाईन’ क्षेत्रातील ‘विनय’शील ‘इनोव्हेटर’ अर्थात नाविण्यपूर्ण डिझाईन बनवून राजकीय क्षेत्रातील अनेकांना ‘ब्रँड’ बनवणारा अवलीया म्हणजे विनय रावळ…जाहिरातीच्या युगात तरुणांना आदर्श वाटावा असा डिझाईन क्षेत्रातील प्रेरणादायी जीवनप्रवास घडवणारे विनय रावळ यांच्या यशस्वी ‘अभिनव’ वाटचालीचा घेतलेला हा आढावा…
कराडजवळ उंब्रज नावाचे मोठे गाव…शेती आणि पशुपालनासह वीट आणि वाळू व्यावसाय हे येथील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधण. सुमारे २५ वर्षांपूर्वी म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ४ थी पर्यंतचे शिक्षण. त्यानंतर गावातीलच महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५ ते १० वी पर्यंतच्या शिक्षणाचे धडे विनय रावळ यांनी गिरवले. त्यावेळी सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा विद्यार्थी अशी त्यांची ओळख. जिल्हा, तालुका आणि राज्यस्तरापर्यंत कला क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या विनय यांना कला विश्व महाविद्यलय, सांगली येथे झालेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये १९९७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्याहस्ते पारितोषिक मिळाले होते. अत्यंत प्रेरणादायी ठरलेल्या या प्रसंगातून कला क्षेत्रातच करिअर करायचे, असा निर्धार विनय यांनी केला.
दरम्यान, सांगली येथील कला विश्व महाविद्यालयमध्ये त्यांनी पायाभूत कला शिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. एक वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमानंतर त्यांनी पुणे येथील प्रतिष्ठीत अभिनव कला महाविद्यालयामध्ये दहावीनंतर जीडी आर्ट या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरात मामांच्या घरी वास्तव्य. त्यामुळे विनय यांचा पिंपरी-चिंचवड शहराशी जिव्हाळा निर्माण झाला. विशेष म्हणजे, मामा दीपक गळीतकर राजकीय क्षेत्रात कार्यरत आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे तत्कालीन पदाधिकारी असल्यामुळे राजकीय घडामोडींवर बारिक लक्ष. अभ्यासक्रमात स्केचिंग, लॅन्डस्केप, फोटोग्राफी, कॅलिग्राफी, इलस्ट्रेशन, पेज लेआउट, कलर स्किम अशा विविध विषयातील त्यांनी अभ्यास केला. दुसरीकडे, राजकीय क्षेत्रातील विविध लोकांशी त्यांचा जनसंपर्कही वाढला होता. त्याचे कारण दिलदार मनाचा मामा असलेल्या प्रदीप गळीतकर यांचे परिसरातील नागरिकांशी असलेले सलोख्याचे संबंध. त्यांचा भाचा म्हणून विनय यांना मिळणाले लोकांचे प्रेम. त्यातच सलग पाच वर्षे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारा अभिनव विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी म्हणजे विनय रावळ अशी ओळख त्यांनी निर्माण केली. हिच खरी एका उभरत्या कलावंताच्या यशस्वी वाटचालीची सुरूवात होती.
पहिली नोकरी असिस्टंट स्टिल फोटोग्राफर…
पुण्यामध्ये फोटोग्राफी डिप्लोमा अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विनय रावळ यांना पहिली संधी मिळाली ती मुंबईतील पूजा फिल्म इंडस्ट्रिजमध्ये…साल होते २००१. त्यानंतर सुमारे दोन वर्षे ओम जय जगदीश, मुझे कुछ केहना है, रहेना है तेरे दिल मे, दिवानापण आदी चित्रपटांसाठी स्टिल फोटोग्राफर म्हणून कामगिरी बजावली आहे. त्यावेळी आठ तासांच्या शिफ्टसाठी ३०० रुपयांचे मानधन मिळत होते. मित्र अथवा सहका-यांच्या रुमवर राहणे आणि मिळेल त्या मेस मध्ये उदरभरण करणे हा नित्यक्रम.
युनिटी एडव्हटाईझिंग पहिली फर्म…
२००४ मध्ये विनय रावळ यांनी व्यावसाय क्षेत्रात पदार्पण करण्याचा संकल्प केला. त्यावेळी मित्र आणि मार्गदर्शक यांच्या विचाराने युनिटी ॲडव्हरटाईझिंग नावाची फर्म सुरू केली. सुमारे पाच ते सहा वर्षे यशस्वी व्यावसाय केल्यानंतर काही अडचणींमुळे ही फर्म बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यावेळी असलेल्या भागिदारांपासून विनय यांनी वेगळा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प केला. त्यातूनच नवीन कंपनीचा उदय झाला.
श्री समर्थ ॲडव्हटाईझिंग कंपनीचा उदय…
डिझाईन क्षेत्रातील सात-आठ वर्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे विनय रावळ यांनी स्वतंत्र कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये श्री समर्थ ॲडव्हटाईझिंग या नावाने नवीन कंपनीची स्थापना करण्यात आली. त्याद्यावर आठ ते दहा संस्थांची डिझाईन आणि प्रिंटिंगची काम घेण्यास त्यांनी सुरूवात केली. विशेष म्हणजे, २०१२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे कंपनीला राजकीय लोकांच्या ‘ब्रँडिंग’ची मोठी कामे मिळाली. त्यावेळी शहरात अगदी मोजके डिझाईनर शहरात होते. मात्र, नाविण्यपूर्ण डिझाईन करुन सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये अल्पवधीत विनय रावळ यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सध्यस्थितीला शहरातील ४४ नगरसेवक, दोन आमदार आणि शासकीय कार्यालय तसेच अनेक कंपन्यांच्या डिझाईन व प्रिंटींगचे काम ‘श्री समर्थ’च्या माध्यमातून सुरू आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/66db5eed-e67d-4f34-bb6f-407cbd8da7fc-1-1024x590.jpg)
राजश्री रावळ यांची खंबीर साथ…
नाशिक येथील निकम कुटुंबातील राजश्री यांच्यासोबत २००६ मध्ये विनय यांचा विवाह झाला. मुलगा समर्थ आणि मुलगी राजलक्ष्मी अशी दोन गोंडस आपत्य आहेत. फॅशन डिझाईन क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण केलेल्या राजश्री यांनी घर आणि व्यावसायात विनय यांची ताकदीने साथ दिली. डिझाईन आणि कार्यालयाचा भार स्वत:च्या खांद्यावर सांभाळणा-या राजश्री अत्यंत मृदूस्वभावाच्या आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच ‘श्री समर्थ’ची वाटचाल यशस्वी करु शकलो, असे विनय प्रामाणिकपणे सांगतात. तसेच, मोठे बंधू राजीव रावळ यांनी रोटरी क्ल्ब ऑफ उंब्रजच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आजवरच्या वाटचालीमध्ये दादांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, असेही विनय सांगतात.
‘आधार सोशल फाउंडेशन’द्वारे सामाजिक कार्य…
मित्र आणि हितचिंतकांचा मोठा साठा असलेल्या विनय रावळ यांनी आपण ज्या मातीत, ज्या समाजात जन्माला आलो. त्या समाजाचे आणि मातीचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून ‘आधार सोशल फाउंडेशन’ची निर्मिती केली आहे. त्याद्वारे सर्व मित्र आणि हितचिंतकांच्या मदतीने सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम हाती घेतले जातात. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, पर्यावरण जनजागृती, वृद्ध नागरिकांना मदत, गरिब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची मदत, तसेच राजकीय लोकांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळे ‘आधार सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरी समस्यांची सोडवणूक करण्यात येत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Vinay.jpg)
भोसरीचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे, उद्योजक कार्तिक लांडगे, प्रसाद कुलकर्णी आणि प्रतापराव मोहीते यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी आजवर या क्षेत्रात चांगली कामगिरी करु शकतो. ‘डिझाईन’ क्षेत्रात करिअर करण्यासाठी कमालीचे सातत्य आणि सराव असायला हवा. नवोदित डिझाईनर यांनी निरीक्षण क्षमता वाढवावी. तसेच, अलिकडच्या काळात डिझाईन कॉपी करण्याचा प्रकार रुढ झाला आहे. त्यामुळे नाविण्यपूर्ण डिझाईन बनवण्याचे प्रमाण कमी दिसते. या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल, तर ‘इनोव्हेटीव्ह डिझाईन’ निर्माण करुन नवनवीन संकल्पना अवलंबून स्वत:च्या ठसा उमटवला पाहिजे.
– विनय रावळ, जी. डी. आर्ट, अभिनव कला महाविद्यालय, पुणे.