breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरून शरद पवारांचा दोन्ही राजेंना सणसणीत टोला

पंढरपूर – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले व संभाजीराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सणसणीत टोला हाणला. ‘दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा,’ असं खोचक सल्ला पवारांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शरद पवारांनी मराठा आरक्षण, संजय राऊत-देवेंद्र फडणीवस भेट व सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरील प्रश्नांना उत्तरं दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर जातनिहाय आरक्षण रद्द करा अशी भूमिका उदयनराजे यांनी अलीकडंच मांडली होती. तर, सरकार दखल घेत नसेल लढावंच लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. याबाबत विचारलं असता पवारांनी दोन्ही राजेंना सुनावले. ‘उदयनराजे व संभाजीराजे या दोघांनाही भाजपनं राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यामुळं ते भाजपचीच भाषा बोलणार,’ असं सूचक वक्तव्य पवारांनी केलं.

संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला कुठलाही राजकीय अर्थ नसल्याचे पवार म्हणाले. ‘संजय राऊत हे एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांनी आधी माझी मुलाखत घेतली होती. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांचीही मुलाखत घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं त्यांच्या भेटीत राजकीय काहीही नाही. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कुठल्याही परिस्थितीत पाच वर्षे पूर्ण करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राऊत-फडणवीसांच्या भेटीवर युतीचा फॉर्म्युला मांडला होता. राष्ट्रवादीलाही एनडीएमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. आठवलेंच्या या वक्तव्याची पवारांनी खिल्ली उडवली. ‘रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार वा खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहातही कुणी गंभीरपणे घेत नाही,’ असं पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button